नांदुऱ्याच्या नगराध्यक्षानी बांधले शिवबंधन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

CM - Uddhav Thackeray - Mahrastra Today

मुंबई : लॉकडाऊनची तयारी सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. शुक्रवारी जनतेला संबोधित करण्याआधी त्यांनी एक राजकीय कार्यक्रमही उरकून घेतला. तो म्हणजे नांदुऱ्याच्या नगराध्यक्षांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा. स्थानिक नगरविकास आघाडीकडून राखीव असलेल्या मतदारसंघातून नगराध्यक्षपदी जनतेतून विराजमान झालेल्या नांदुऱ्याच्या नगराध्यक्ष रजनी जवरे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक शिवसेना नेतृत्वाला बगल देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व्हाया खान्देश मार्गे हा प्रवेश झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

येथील नगराध्यक्षपदाचे एक वर्ष शिल्लक असताना व या पदासाठी अविश्वास ठरावाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा सोयीचा प्रवेश झाल्याची चर्चा रंगली आहे. चार वर्षांपूर्वी जनतेतून झालेल्या नांदुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राखीव पदासाठी आमदार एकडेप्रणीत नगरविकास आघाडीतून नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या रजनी जवरे यांचा राजकीय प्रवास हा गेल्या चार वर्षात अस्थिर असाच पाहावयास मिळाला. सुरुवातीला नगराध्यक्षपदाचा काही कार्यकाळ होत नाही तोच रजनी जवरे यांनी स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नगरविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक नगरविकास आघाडीने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता.

नंतर मात्र आमदार संचेती यांचा पराभव झाल्याने व मतदारसंघाचे नेतृत्व आमदार राजेश एकडे यांच्याकडे जाण्यासोबतच राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने नगराध्यक्षपद धोक्यात येते की काय, अशी अवस्था असताना रजनी जवरे यांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेवत खान्देशच्या शिवसेना युवा नेतृत्वाला हाताशी धरून व्हाया नगरविकास मंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास करत हातात शिवबंधन बांधल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button