शिवानीची बाइकशाळा

Shivani Rangole

मालिकेच्या दोन शॉटमध्ये वेळ मिळाला, की कलाकार एक तर त्यांच्या स्मार्टफोनमध्ये घुसतात किंवा ग्रीनरूममध्ये जाऊन एक डुलका काढतात. यापैकी काहीच करायचं नसेल, तर मग ऑफस्क्रीन त्यांची धमाल-मस्ती सुरू असते मग काही गाण्यावर मीन्स बनवणे किंवा कॉमेडी व्हिडिओ बनवणे असा विरंगुळा शोधत असतात. अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) मात्र यापैकी काहीच करत नसून ती बाइक शिकत आहे. शॉटमधून तिला जेव्हा रिकामा वेळ मिळाला की तिची बाइकशाळा सुरू होते. आता ही बाइकशाळा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, सांग तू आहेस का या शिवानीच्या नव्या मालिकेत तिला बाइक चालवणारी मुलगी साकारायची आहे. त्यामुळेच तिची सेटवर रिकाम्या वेळी अशी बाइकशाळा सुरू आहे. आता बऱ्यापैकी तिला बाइक चालवायला येत असून सराव म्हणून रिकामा वेळ मिळाला की सेटभोवती बाईकची एक फेरी मारते

कलाकारांना त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी काही कौशल्ये शिकावी लागतात. ज्यांना अभिनयात करिअर करायचं आहे ते या क्षेत्रात येण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी शिकून येतात. त्यामध्ये डान्स, ॲक्शन, स्टंट या गोष्टी तर येतातच पण जेव्हा एखादी भूमिका करायला मिळते तेव्हा त्या त्या भूमिकेचा एक बाज असतो. अनेक भूमिका ह्या एखाद्या जलतरणपटूच्या असतात. तर काही भूमिकांसाठी घोडेस्वारी यावी लागते. पंधरा दिवसापूर्वी नव्याने सुरू झालेल्या सांग तू आहेस का या मालिकेमध्ये शिवानी रांगोळे ही वैभवी या नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत वैभवी ही अतिशय सामान्य घरातील मुलगी दाखवण्यात आली आहे, जी आजकालच्या नेहमीच्या मुलींप्रमाणेच स्कूटी चालवते. मात्र शिवानीला स्कूटी चालवता येत नव्हती, आणि म्हणूनच तिला या नव्या भूमिकेसाठी स्कूटी चालवायला शिकावी लागली. जेव्हा या मालिकेच्या प्रदर्शनापूर्वीचे शूटिंग वेळापत्रक सुरू झालं तेव्हा एपिसोड बँक करण्याबरोबरच शिवानी या मालिकेच्या सेटच्या परिसरामध्ये बाइक शिकवण्याचेसुध्दा धडे गिरवत होती. गेल्या पंधरा दिवसात तिने बऱ्यापैकी बाइकवर कमांड मिळवली असून अजूनही तिची बाइक शिकण्याची प्रोसेस सुरूच आहे.

थ्रिलर आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टीची केमिस्ट्री असलेल्या सांग तू आहेस का या मालिकेमध्ये शिवानी चा अभिनय पाहण्याची पर्वणी तिच्या चाहत्यांना मिळत आहे. बाइकसोबत तिचे या मालिकेत अनेक सीन असल्यामुळे अत्यंत सराईतपणे तिला बाइक चालवता येणं गरजेचं होतं.

शिवानी सांगते, पुण्यात असताना, कॉलेजमध्ये मी बाइक चालवली होती, मात्र कामाच्या निमित्ताने मुंबईत आल्यापासून बाइक चालवणे बंद झालं.त्यामुळे थोडीशी विसरल्या सारखं झालं होतं. शिवाय या मालिकेमध्ये माझ्यावर बाइक चालवताना अनेक प्रसंग चित्रित होणार होते त्यामुळे मी कुठेही त्या दृश्यामध्ये नवशिकी आहे किंवा नुकतीच बाइक शिकले आहे असं दिसून न येता तो आत्मविश्वास माझ्यामध्ये दिसावा हेही खूप आवश्यक होतं. त्यासाठीच म्हणून मी असा निर्णय घेतला की पुन्हा एकदा बाइक चालवण्याची थोडी तयारी करावी. पण जेव्हा पहिल्या दिवशी मी बाइक चालवायला घेतली, तेव्हा मला अजिबात चालवायला आली नाही. माझ्या चेहऱ्यावर बाइक चालवतानाचा गोंधळ चेहऱ्यावर दिसत होता जो या भूमिकेसाठी योग्य नव्हता. आता गेले दहा ते पंधरा दिवसांपासून मी बाइक शिकले आणि रोज माझ्या सेट परिसर आहे तिथे देखील बाइक चालवण्याची प्रॅक्टिस करते. सहाजिकच सध्या मालिका सुरू झाल्यामुळे दोन शॉटमध्ये जो काही वेळ मिळतो किंवा जेव्हा माझा सीन नसेल तेव्हा मी गेल्या पंधरा दिवसांमध्ये बाइक शिकत राहते.

मालिका, सिनेमा, नाटक, निवेदन अशा सर्व क्षेत्रांमध्ये शिवानी रांगोळे हिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बनमस्का, आम्ही दोघी, या मालिकेतील तिची भूमिकादेखील गाजली होती. तर काही दिवसांपूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेल्या मालिकेत शिवानीने रेखाटलेली रमाबाईंची भूमिका तिच्या इतर भूमिकांपेक्षा नक्कीच वेगळी होती. तिच्या चाहत्यांकडून तिला या भूमिकेसाठी खूप कौतुक लाभलं होतं. सध्या शिवानीने तिचा लूक बदलला असून शॉर्ट हेअर मध्येदेखील ती कमालीची सुंदर दिसत आहे. सांग तू आहेस का या मालिकेच्या निमित्ताने बाइक शिकण्याची संधी मिळाली आणि यापुढे जेव्हा मी पुण्यात जाईन तेव्हा माझ्या आवडत्या ठिकाणी बाइकवरून फिरायला मजा येईल असं शिवानी आवर्जून सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER