शुभांगीताईकडून शिवानीला मिळाली ड्रेसची गिफ्ट

अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाची अशी इच्छा असते की या क्षेत्रात तगडा अनुभव असलेल्या कलाकारासोबत काम करायला मिळावं आणि त्यांच्याकडून आपल्या अभिनयाला दाद मिळावी. सध्याच्या लोकप्रिय मालिकेच्या रांगेत असलेल्या राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवनीची भूमिका साकारणाऱ्या शिवानी सोनार (Shivani Sonar) हिनेही हे स्वप्न पाहिले होते आणि पहिल्याच मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांच्याकडून शिवानीच्या अभिनयाचे कौतुक तर झालेच पण त्यासोबत तिला एक छान ड्रेसची गिफ्टदेखील मिळाली. हा किस्सा शिवानीने शेअर केला आणि कलाकारांचे मोठेपण त्यांच्याकडून आमच्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन देण्याच्या मोठेपणातच असतं असं सांगत शिवानीने इंडस्ट्रीतील अनुभवाची शिदोरी असलेल्या कलाकारांनाही मानाचा मुजरा केला.

काही जाहिराती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील लक्ष्मीबाई ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर शिवानी सोनार हिला राजा राणीची गं जोडी या मालिकेत संजीवनी ढालेपाटील ही भूमिका करण्याची संधी मिळाली. लग्नाआधीची अल्लड आणि चुलबुली संजू लग्नानंतर गावातील बडं प्रस्थ आणि खानदानी रितीरिवाजाची परंपरा असलेल्या ढालेपाटील यांची सून या भूमिकेच्या दोन्ही शेडस् शिवानीने अगदी छान प्रकारे अभिनयातून दाखवल्या आहेत. पण जेव्हा या मालिकेसाठी शिवानीची निवड झाली तेव्हा तिच्या रणजित हा नायकाच्या भूमिकेत असलेला मणिराज पवार याचीही ही पहिलीच मालिका होती. मणिराजप्रमाणे शिवानीलाही खूप टेन्शन आलं होतं. या मालिकेत सासूबाईंच्या भूमिकेत शुभांगी गोखले असणार आहेत हे कळल्यावर शिवानीला दडपण आलं होतं. सासू सूनेच्या भूमिकेत दोघी असणार म्हटल्यावर दोघींचे एकत्र सीनदेखील खूप असणार हे शिवानीला कळलं. त्यांच्यासमोर आपला कसा निभाव लागणार या विचाराने शिवानी सुरूवातीला खूप विचारातही पडली. पण जेव्हा मालिकेसाठी काही भागांची तालीम केली, तसेच कलाकारांचे एकमेकांशी ट्यूनिंग जुळावे म्हणून काही सीन शूट केले. तेव्हा शुभांगी गोखले शिवानीकडे आल्या आणि म्हणाल्या की, प्रत्येकजण कधी ना कधी या क्षेत्रात नवीन असतो. जशी वर्ष सरतात, कामं मिळत जातात तेव्हा तो अनुभवाने एकेक पायरी वर चढत जातो. त्यामुळे तू तुझं काम व्यवस्थित कर. आपल्यासमोर कोण वयाने मोठा आहे, अनुभवाने जास्त आहे म्हणून दबून जाऊ नको. तुझ्यासाठी ही मालिका पहिलीच आहे तशी माझ्यासाठी या मालिकेतील व्यक्तिरेखा पहिलीच आहे. त्यामुळे आपण दोघीही एकाच वाटेवरच्या प्रवासी आहोत. शुभांगी गोखले यांनी शिवानीशी साधलेल्या या संवादानंतर तिचे टेन्शन कुठच्या कुठे पळून गेले आणि पुढच्या क्षणी वयाचे अनुभवाचे अंतर विसरून दोघीही छान मैत्रिणी झाल्या.

शिवानी सांगते, मी दुसऱ्या दिवशी सेटवर पोहोचले तेव्हा माझ्या मेकअपरूममध्ये एक गिफ्ट बॉक्स होता. त्यासोबत माझ्या नावाने एक चिठ्ठीही होती. मला उत्सुकता वाटली की हे काय असेल. मी गिफ्ट उघडून पाहिलं तर माझ्या आवडीच्या रंगाचा एक छानसा टॉप होता. चिठ्ठीत लिहिलं होतं की शिवानी, तू खूप छान काम करत आहेस. अभिनयाची चांगली जाण आहे. असंच छान काम करत रहा. खाली शुभांगीताईचं नाव होतं. ही अशी कामाची पावती, प्रोत्साहन मी पहिल्यांदाच अनुभवत होते. मी लगेच शुभांगीताईच्या मेकअप रूममध्ये गेले आणि तिला घट्टी मिठी मारली. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे. मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे. रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे. अभिनयासोबत ती डान्स आणि मेकअप आर्टिस्टही आहे. लूक क्रिएशनमध्ये शिवानीला खास स्वारस्य असून एखादी साडी कोणत्या प्रकारची आहे त्यावर ती कोणते दागिने घालायचे, लूक कसा कॅरी करायचा याविषयीचे फोटो तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER