आढळरावांनी मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा – अमोल कोल्हे

Amol Kolhe-Shivajirao Andhrava Patil

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिरुरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सातत्याने टीका करतांना दिसत आहे. त्यांनी नुकताच अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कोल्हे यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भोसरी येथे बोलताना आढळराव यांनी मतदार संघातील तीन महिन्यांच्या कामगिरीनंतर डॉ. कोल्हे यांच्यावर कडाडून टीका केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळावे यासाठी खासदार डॉ. कोल्हे महाराष्ट्रातले किती किती मतदारसंघ फिरताहेत. लोकांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देऊन भावनेचं राजकारण केलं.

कुठं आहेत ते आता? ते जिथे जिथे जातात तिथले लोक पक्षाला सोडून निघत आहेत. शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल, अशी घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली. याला डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर येथे पोहोचलेल्या शिवस्वराज्य यात्रेतून प्रत्युत्तर दिले.

कोल्हे म्हणाले, की पराभवाच्या नैराश्यातून आढळराव अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत. परंतु, त्यांनी जनतेकडून मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा. आढळरावांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्लाच कोल्हे यांनी दिला. आता कोल्हे यांच्या टीकेला आढळराव पुन्हा काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.