
एम टीव्ही रोडीजचा फायनलिस्ट, बिग बॉस मराठीचा विजेता अशा दोन बंपर बक्षीसांचा मानकरी ठरलेला शिव ठाकरे सध्या त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एक तो मी नव्हेच अशा आशयाचा संदेश देत आहे. आता तुम्ही म्हणाल की, तो मी नव्हेच या नाटकाच्या निमित्ताने शिव प्रमोशन करत असेल. किंवा अशा नावाची मालिका, शोमध्ये शिव दिसणार असेल त्याची जाहीरात करत असेल. पण शिव सध्या एका वेगळ्याच कचाट्यात अडकला आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याची ही ऑनलाइन धडपड सुरू आहे. शिवच्या नावाने फेसबुकवर कुणीतरी फेक अकाउंट बनवलं असून त्याच्यानावाने मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, आर्थिक कारण सांगून पैसे देण्याची विनंती करणे असे प्रकार सुरू आहेत. शिवच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने सायबरकडे तक्रार तर केली आहेच पण त्याच्या अधिकृत अकाउंटवरून चाहत्यांना सावधही करत आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या बातम्या आपल्या सर्वांच्याच कानावर येत आहेत. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी कलाकारही या आमिषाला बळी पडत आहेत. मध्यंतरी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची नायिका अमृता धोंगडे हिला बनावट मेसेज करून पाठवलेल्या लिंकला क्लिक केल्याने तिचे इन्स्टा पेज हॅक केले आणि त्यासाठी तिला ४० हजार रूपयांची खंडणी मागितली. अभिनेत्री जुई गडकरी हिलाही अशाच धमक्या येत होत्या. असाच धक्कादायक अनुभव शिव ठाकरे याला आला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवच्या फेसबुकचे बनावट अकाउंट तयार केल्याचे त्याला लक्षात आले. शिव सांगतो, मी ज्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेलीच नाही त्यांच्याकडून ती अॅक्सेप्ट झाल्यानंतर मला नोटीफिकेशन्स आल्या. शिवाय मी समजून ज्या मुलींनी फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली त्यांना चुकीचे मेसेज पाठवले जाऊ लागले. याबाबत मला माहिती मिळाल्यानंतर मी अधिक खोलात शिरलो. तेव्हा ज्या फेसबुकवरून ते मेसेज गेले आहेत ते माझे अधिकृत अकाउंट नसल्याचेही मला दिसले. त्याही पुढे जाऊन मला पैशाची गरज आहे, किंवा अन्य कुणाला तरी पैसे हवे आहेत आणि ते पाठवावेत अशी मी विनंती करत असल्याचेही मेसेज या बनावट फेसबुकवरून केले होते. हे सगळं बघून मला धक्काच बसला.
पहिल्यांदा सायबर सेलकडे तक्रार केली आणि ज्यांना अजून या प्रकाराची माहिती नाही त्यांच्यासाठी माझ्या सगळ्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून, मी असे कोणतेही दुसरे अकाउंट बनवलेले नसून मी पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करू नयेत असे आवाहन केले. त्यानंतर हा प्रकार माझ्याशी ऑनलाइन कनेक्ट असलेल्यांना कळाला. सध्या शिवने सायबर सेल आणि स्वत: आवाहन करून हे प्रकरण आटोक्यात आणले असले तरी त्याला या काळात खूप मनस्ताप सहन करावा लागला.
खरंतर आजच्या प्रसिद्धीच्या जगात कलाकारांसाठी सोशल मीडिया हे माध्यम खूप उपयोगी आहे. त्यांच्या नव्या मालिका, सिनेमांच्या प्रमोशनसाठी तसेच विविध फोटो पोस्ट करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वच कलाकार ऑनलाइन सक्रिय असतात. शिव ठाकरे हा देखील त्याच्या चाहत्यांसाठी अनेक फोटो, व्हिडिओज शेअर करत असतो. पण याच ऑनलाइन फसवणुकीचा फटका कलाकारांना बसण्याचे प्रमाण वाढल्याने कलाकारांनीही या माध्यमाचा धसका घेतला आहे.
शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा असून अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच नृत्याची आवड असल्याने त्याने स्वत: व्हिडिओ बघून नृत्य शिकला. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घेत शिक्षण पूर्ण केले. सुरूवातीच्या काळात तो वृत्तपत्र विक्रीचे काम करायचा. त्याने शेतीमध्ये राबून पैसे कमावले आहेत. एमटीव्ही च्या रोडीज या रिअॅलिटी शोमध्ये त्याची निवड झाली आणि या स्पर्धेत तो अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी या शोच्या दुसऱ्या सीझनचाही तो विजेता आहे. याच शोमध्ये त्याचे आणि अभिनेत्री वीणा जगतापचे प्रेम जुळले असून लवकरच ही जोडी लग्न करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला