लष्करेंचा शिवा हिंदीच्या पडद्यावर

Ashok Phal Dessai - Aditya Redij

सिनेमाचा रिमेक येणार हे आता काही फार नवीन राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये एखादी कलाकृती गाजली की, त्याची अन्य भाषेतील आवृत्ती तयार केली जाते. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्रेंड जोरात सुरू आहे. आजपर्यंत सिनेमांचे रिमेक होत होतेच; पण आता मालिकांचे रिमेक होत आहेत. यामध्ये ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेचा हिंदी रिमेकही दाखल झाला आहे. त्यामुळे मराठमोळ्या शिवाची क्रेझ आता हिंदीमध्येदेखील पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचा आदित्य रेडीज (Aditya Redij) हिंदीतील शिवा लष्करेची भूमिका करणार असून त्याने खास ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेची पारायणे करून शिवाची व्यक्तिरेखा समजून घेतली आहे.

‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील शिवा लष्करे आणि सिद्धी लष्करे यांची जोडीदेखील प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान जुळून आली असल्याने त्यांच्या नात्यात कितीही चढ-उतार आले तरी त्या दोघांनी एकत्र असावं असं म्हणत या मालिकेचे चाहते सतत या मालिकेसंदर्भातल्या वेगवेगळ्या अपडेट पोस्ट करत असतात. तीन वर्षांपासून ही मालिका छोट्या पडद्यावर सुरू आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळेच या मालिकेचा हिंदी रिमेक करण्याची कल्पना पुढे आली आणि लवकरच आता शिवा हे मराठी मालिकेतील नाव हिंदीमध्ये गाजवण्यासाठी तयार झाले आहे.

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतील लष्करे कुटुंबातील सगळेच सदस्य प्रेक्षकांना खूप आवडतात. मालिकेतील शिवाची व्यक्तिरेखा अत्यंत रांगडी आहे तर त्याची बायको सिद्धी ही उच्चशिक्षित आहे. अशा व्यक्तींचे लग्न होते आणि ते संसार करायला लागतात तेव्हा त्यांच्यामधील वैचारिक अंतर हे कधी कधी त्यांच्या वादाचे कारण बनते. इतकंच नव्हे तर उच्चशिक्षित मुलगी जेव्हा अशा घरांमध्ये सून बनून येते, ज्या घरांमध्ये शिक्षणाला फारसे महत्त्व नाही त्या घरांमध्ये त्या मुलीची काय घुसमट होऊ शकते यावर ही मालिका बेतलेली आहे. मात्र त्या अनुषंगाने येणारी अनेक उपकथानके या मालिकेत उत्कंठा वाढवण्यासाठी मदत करत आहेत. ही सगळी भट्टी जुळून आल्यामुळे ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आता लवकरच या मालिकेचा हिंदी रिमेक छोट्या पडद्यावर येणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये हिंदी मालिकेमध्ये शिवाची मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा आदित्य रेडीज आणि मराठी मालिकेतील शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई यांची भेट झाली. यावेळी आदित्यने अशोककडून खूप टिप्स घेतल्या. येत्या काही दिवसांतच ‘जीव झाला येडापिसा’च्या हिंदी रिमेकच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याने ही संपूर्ण टीम खुशीत आहे.

यासंदर्भात अशोक फळदेसाई (Ashok Phal Dessai) सांगतो की, कोणत्याही कलाकाराला आपण काम करत असलेली मालिका दुसऱ्या भाषेमध्ये प्रेक्षकांसमोर येणार हे ऐकून नक्कीच आनंद होईल. हे मालिकेच्या टीमचे यश आहे असं मला वाटतं. आजपर्यंत अनेकदा हिंदी मालिकांचा मराठी रिमेक आपण पाहिला आहे; परंतु आपल्या मराठी भाषेतील एखादी मालिका हिंदीतील प्रेक्षकांपर्यंत पोहचवावी असं वाटणं हे मराठी कलाकार म्हणून खूप अभिमानास्पद आहे.

सध्या काही मराठी मालिका मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेमध्ये रिमेक करून दाखवल्या जात आहेत. यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका कार्तिक पौर्णिमा या नावाने हिंदी भाषेमध्ये सुरू आहे. तर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचाही रिमेक अनुपमा या नावाने लोकप्रिय होत आहे. आता याच पंक्तीत ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका आली असून शिवा या नावाने ही मालिका हिंदी भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER