शिव बनला परफ्यूम मेकर

Shiv Thackeray

सध्या प्रत्येक व्यक्ती ही एकाच कामावर अवलंबून राहू शकत नाही हे कोरोनाने दाखवून दिले. अर्थार्जन देणारा एक मार्ग जर कोलमडला तर दुसरा पर्याय खुला असायला हवा याचा प्रत्येकालाच अनुभव आला. यामध्ये सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रिटीदेखील आहेत. सेलिब्रिटी कलाकार ,अभिनय, दिग्दर्शन याव्यतिरिक्त एक जोड व्यवसाय करताना दिसतात. काही कलाकारांचं हॉटेल आहे तर काही कलाकारांनी त्यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे. ड्रेसिंग असेल, फॅशन असेल किंवा हॉटेल असेल अशा विविध क्षेत्रांत  आजच्या घडीचे आघाडीचे कलाकार हे एक बॅकबोन तयार ठेवत आहेत. अभिनेता आणि कोरिओग्राफर शिव ठाकरे (Shiv Thackeray) यानेदेखील त्याचा परफ्यूम ब्रँड बनवला असून आता डिओडरंट क्षेत्रातील उद्योजक म्हणून नव्या क्षेत्रात त्याने पाऊल टाकलं आहे. सोशल मीडिया पेजवर त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे आणि हा नवा व्यवसाय माझ्या करिअरला नवा गंध येईल, असे  त्याने  नवीन पोस्ट शेअर केली आहे. बी रिअल असं त्याच्या या नव्या ब्रँडचे नाव आहे.

प्रचंड संघर्ष आणि ऑडिशनची पारायणे करत शिवने मनोरंजन क्षेत्रात त्याची ओळख बनवली आहे. निरागस व्यक्तिमत्त्व आणि जे मनात येईल ते बोलण्याचा स्वभाव यामुळे शिव ठाकरेच्या फॅन फॉलोइंगमध्येही तुफान वाढ झाली. अभिनेता बनण्यासाठी इंजिनीअरिंग सोडून शिव ठाकरे याने अमरावतीवरून मुंबई गाठली. एका छोट्या गावात शिवचं आयुष्य गेल्यामुळे मेट्रो सिटीतील लाईफ स्टाईल त्याच्या गावकडच्या लाईफपेक्षा खूप वेगळी होती. त्यामुळे सुरुवातीला मनोरंजन क्षेत्रांमध्ये त्याला खूप नकार पचवावे लागले; पण अतिशय सर्वसामान्य घरातून आलेल्या शिवने कष्ट आणि संघर्ष करत त्याच्या नृत्यकौशल्याच्या आधारावर या क्षेत्रात स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं.

शिव सांगतो, अभिनेता म्हणून मला सुरुवातीला काहीच संधी मिळाल्या नाही. पण मी प्रयत्न सोडले नाही. मला नृत्यकौशल्य येत होतं त्यातूनच मी नृत्य अकॅडमी सुरू केली. मी नृत्यकलाकार होण्याचं स्वप्न घेऊन या क्षेत्रात येणाऱ्या मुलामुलींना नृत्याचे धडे देत त्यांच्यामध्ये मी माझी स्वप्नं स्वप्न कुठे तरी पाहात होतो. बिग बॉस शोने माझं आयुष्य बदलून टाकलं. लोक मला ओळखायला लागले. अजूनही मनासारखं काम आणि संधी मिळत नव्हती. अर्थात या क्षेत्रामध्ये योग्य संधी मिळण्यासाठी एक थांबा घ्यावा लागतो आणि मी नेहमीच या क्षणाची वाट पाहिली. अभिनय हे माझं पहिलं प्रेम आहेच; पण त्याबरोबरच या सगळ्या गोष्टींना आर्थिक पाठबळ लागते याचीदेखील मला जाणीव आहे .

शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा असून अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच नृत्याची आवड असल्याने त्याने स्वत: व्हिडिओ बघून नृत्य शिकला. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घेत शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो वृत्तपत्र विक्रीचे काम करायचा. त्याने शेतीमध्ये राबून पैसे कमावले आहेत. एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याची निवड झाली आणि या स्पर्धेत तो अंतिम फेरीत पोहचला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी या शोच्या दुसऱ्या सीझनचाही तो विजेता आहे. याच शोमध्ये त्याचे आणि अभिनेत्री वीणा जगतापचे प्रेम जुळले असून लवकरच ही जोडी लग्न करणार आहे.

अतिशय संघर्ष करून शिव ठाकरे त्याच्या आतापर्यंतच्या यशापर्यंत पोहचलेला आहे. इंजिनीअरिंग शिकत असताना त्याला नृत्याची आवड होती; परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरी करणेदेखील भाग होतं. जेव्हा त्याला नोकरी मिळाली तेव्हा त्या ऑफिसमधील बॉसने असं सांगितलं होतं की, तुला १२ ते १५ तास काम करावे लागेल आणि सुटी मिळेलच याची खात्री नाही. त्या वेळेला फक्त एका कारणासाठी शिवने ती नोकरी स्वीकारली नाही आणि ते कारण होतं की, जर मी इतकं काम करून माझ्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी एक सुटीसुद्धा घेऊ शकत नसेन तर त्या नोकरीमध्ये मला काहीही समाधान मिळणार नाही. आयुष्यात माणूस त्याच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी काम करत असतो आणि मी नेहमीच नोकरी आणि पैशाच्या मागे धावत राहिलो तर त्यामध्ये मी माझ्या कुटुंबाच्या सहवासात मिळणारे क्षण हरवून बसेन, असा विचार करून शिवने त्या नोकरीला नकार दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER