
मुंबई :- कोकण म्हणजे आम्हीच… अशा अहंकाराने वागणाऱ्यांचे वस्त्रहरण करण्यास कोकणातील जनतेने सुरुवात केली आहे. भाजपा त्यांचे पूर्ण वस्त्रहरण करेल, असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला (Shiv Sena) मारला.भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिका निवडणुका आणि १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे.
यासंदर्भात आज भाजपाची पत्रकार परिषद झाली. बैठकीत आशिष शेलार म्हणाले की, महाआघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये दाणादाण उडाली आहे. हात-पाय मारणे सुरू आहे. प्रलोभनं दाखवून दुसऱ्या पक्षातील लोक फोडून सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताहेत; पण त्यानंतरही त्यांच्या हाती यश लागणार नाही. कोकण म्हणजे आम्हीच… अशा अहंकारी वृत्तीने वागणाऱ्यांचे वस्त्रहरण कोकणातील जनतेने करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पूर्ण दोन ग्रामपंचायती, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (Ratnagiri) मिळून १८२ ग्रामपंचायतींचे भाजपाचे सदस्य निवडून आले आहेत.
याचाच अर्थ कोकणचा कौल, आई भराडी देवीचा आशीर्वाद अन् कोकणच्या लाल मातीतील फळरूपी आशीर्वाद हा भाजपाच्या बाजूनेच आहे. निवडणुका अद्याप बाकी आहेत. पण हा शुभसंकेत आहे की, मुंबई-ठाण्यात आता जनता शिवसेनेची हयगय करणार नाही. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी ‘मालवणचो खाजो पण आमचोच आणि फाफडा पण आपडोच’, असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिडवले.
काँग्रेसच्या (Congress) नशिबी केवळ लाथा खाणेच
“या सरकारच्या काळात काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ केवळ लाथा खाणेच आहे. दररोज लाथा आणि बुक्क्यांचा मार खात काँग्रेसचे जे होणारे विघटन टळू शकणार नाही. शिवसेनेमुळे जर ते होत असेल तर त्याचा अभ्यास काँग्रेसने केला पाहिजे. ” असे शेलार म्हणालेत.
त्यांनी केले तर पळाले, आम्ही केले तर फोडले
फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “त्यांनी केले तर पळाले, आम्ही केले तर फोडले; हा दुटप्पीपणा आहे. त्यातच त्यांचा गेम फेल झाल्याचे दिसते आहे. स्वतःची ताकद नसल्याने एका दुबळ्याला दुसऱ्या दुबळ्याचा हात पकडावा लागल्यामुळे, राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. यातूनच स्पष्ट होते की, त्यांच्याकडे मुद्दलमध्येच काही नाही, तर व्याज काय मिळणार.”
ही बातमी पण वाचा : …अन् जलेबी-फापडा भी आपडो!, आशिष शेलारांची शिवसेनेवर मिस्कील टीका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला