पिंपरी-चंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेची स्वबळाची तयारी, राष्ट्रवादीच्या विरोधात उतरणार?

Maharashtra Today

पिंपरी-चिंचवड :- राज्य सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना ताकत देण्यास सुरवात केली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार करणार असल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी बळ देण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या १० महिन्यावर होणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठांनी नेत्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांना पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत खडे बोल सुनावले, तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत.

दुसऱ्या बाजुला राज्यातील सत्ताधारी शिवसेनेनेही महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी जवळचे संबंध असलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहराची संपूर्ण सूत्रे अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार बारणे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर बारणे यांचे समर्थक असलेले नगरसेवक सचिन भोसले यांनी शिवसेना शहरप्रमुख व गजानन चिंचवडे यांची जिल्हा प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. लवकरच शिवसेना महापालिका गटनेतेपदी बारणे समर्थक अश्विनी चिंचवडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

एका बाजुला पार्थ पवार (Parth Pawar) राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत सारथ्य करणार असल्याची चाहूल लागल्याने शिवसेनेनेही बारणे यांच्या हाती शहराची संपूर्ण सूत्रे दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीची रंगीत तालीम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

स्थायी समिती सदस्य निवडीत शिवसेना पक्षाचे आदेश न पाळल्याचे निमित्त करीत राहुल कलाटे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे खासदार बारणे यांच्यासाठी महापालिका कारभारातील अडथळा सहजच दूर झाला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राहुल कलाटे यांनी विकास कामाच्या निमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी राहुल कलाटे चाचपणी करीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची; शिवसेनेची विखारी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button