मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानाच्या शर्यतीत दिसणार? राष्ट्रीय राजकारणासाठी आदित्यवर मोठी जबाबदारी

Aaditya Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष राष्ट्रीय राजकारणावर केंद्रित केल्याचे अनेकदा दिसून आले. सोबतच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानाच्या शर्यतीत असतील, असे विधान केले होते, त्याचीच तयारी सध्या शिवसेनेकडून सुरू आहे का? अशी चर्चा आता आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे.

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ५० उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारासाठी २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रचाराची मुख्य धुरा ही  पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. तर आता शिवसेनकडून मोठी बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशात होणाऱ्या २३ जागांच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आणि याची सर्वस्वी जबाबदारी खुद्द मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना खास जबाबदारी दिली आहे.

काही महिन्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं, सरकार कोसळल्यानंतर मध्यप्रदेशात भाजपाने सत्तास्थापन केली, मुख्यमंत्रिपदी शिवराजसिंह चौहान विराजमान झाले. मध्यप्रदेशात ज्या बंडखोर काँग्रेस आमदारांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्या रिक्त झालेल्या २३ जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक आहे.  या जागांच्या निवडणुकीसाठी बसपानंतर शिवसेनाही भाजप-काँग्रेसला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने मध्यप्रदेशात पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खास जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेने विशेष लक्ष घातले आहे. ‘पत्रिका’च्या वृत्तानुसार आदित्य ठाकरे यांची टीम मध्यप्रदेशात सर्वेक्षण करीत असून यानंतर २८ जागांपैकी किती जागांवर उमेदवार उभे करायचे  याचा निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बिहार, मध्यप्रदेशात उमेदवार देण्याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा केली आहे.

मालवा-निमार विधानसभा जागेवर शिवसेनेची नजर आहे. हा परिसर महाराष्ट्राच्या सीमेशी जोडलेला आहे. मराठी मतदारही इथे मोठ्या संख्येने आहेत. हे पाहता मालवा-निमार, आगर, हातपीपलिया, नेपानगर, सांवेर, मांधाता, बदनावर आणि सुवासारा या जागांवरही शिवसेना सर्वेक्षण करीत आहे. याचबरोबरच ग्वाल्हेर-चंबळमधील काही जागांवरही शिवसेनेचे लक्ष लागून आहे. ग्वाल्हेर-चंबळमध्ये भाजप-कॉंग्रेसशिवाय इतरांनाही मोठ्या प्रमाणात मते मिळाली. सूत्रांनुसार निवडणूक जिंकण्याऐवजी पक्ष संघटना मजबूत करण्याचा उद्धव ठाकरे यांचा हेतू आहे. पोटनिवडणुकीद्वारे हे समजेल की पक्षाचा पाया किती मजबूत आहे आणि किती मेहनत घ्यावी लागेल.

तसेच शिवसेनेचे नेते पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये जाऊ शकतात. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह अनेक मोठ्या चेहर्‍यांचा समावेश असू शकतो. यावरून महाराष्ट्रात शिवसेनेने सत्ता काबीज केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेरच्या राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संजय राऊतांवर ठाम विश्वास, पुन्हा मुख्य प्रवक्तेपदी वर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER