
अहमदनगर : आज होणाऱ्या अहमदनगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जबर धक्का दिला. त्यामुळे काही वेळातच संपन्न होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराविरोधात शिवसेना उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. घुलेंच्या विरोधात शिवसेनेच्या विजय पठारे यांनी अर्ज दाखल केला. दुपारी तीन वाजता ही निवडणूक पार पडणार आहे.
विशेष म्हणजे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी अहमदनगरला शिवसेना-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता ऐनवेळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीपैकी कोणी माघार घेणार की निवडणूक होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे मनोज कोतकर सभापती झाले होते. त्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. आता या निवडणुकीत कोणते नवे समीकरण पाहायला मिळणार याचीच उत्सुकता सर्वानाच लागली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला