शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी आयोजित केली ‘अजान पठण स्पर्धा’

- म्हणाले, अजानमध्ये आहे खूप गोडवा!

Pandurang Sakpal

मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांनी ‘अजान पठण स्पर्धा’ आयोजित केली आहे. अजानमध्ये आहे खूप गोडवा आहे! मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून बक्षिस देऊ. मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे, अशी माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली. महाआरतीप्रमाणेच अजानचे महत्त्व आहे. ते प्रेम आणि शांतीचं ते प्रतीक आहे. त्यावर वाद घालने उचित वाटत नाही, असे पांडुरंग म्हणाले.

प्रवीण दरेकरांची टीका

पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहे. यात शिवसेनेचे बदलते स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे! बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा म्हणाले असतील, परंतु त्यांची पालखी उचला, असे कधी सांगितले नाही. त्यांची टीका त्यांच्या आचार – विचारावर आहे सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते, अशी टीका भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे. पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार – विचाराला नेतृत्वाला तिलंजला देणारी वाटचाल सुरु आहे ह्याच हे द्योतक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंग्यांवरून भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पडत चालल्याचे दिसते आहे, असे दरेकर म्हणालेत.

शिवसेनेला आता हवा अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू

शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको, अजान स्पर्धेचे आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतीपाठातून मनःशांती मिळत नाही, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून, भजन किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळते! काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की हिंदुत्व हे काय धोतर आहे सोडून द्यायला ? उद्धवजी, धोतर तरी कमरेभोवती घट्ट आवळलेले असते पण तुमचं हिंदुत्व हे खांद्यावरच्या उपरण्यासारखे होते, जे तुम्ही एक वर्षापूर्वीच काढून बाजूला ठेऊन दिले. इतके तकलादू हिंदुत्व शिवसेनेचे होते हे आता सिद्ध झाले आहे, अशी टीका भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसलेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER