महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा शिवसेनेचा डाव; आशिष शेलारांचे आरोप

Ashish Shelar

मुंबई :- भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरून शिवसेना आणि आघाडीवर हल्लाबोल केला. महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची कटकारस्थाने सुरू आहेत. निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. निवडणुका दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असे आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका केली. निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची (Shivsena) काही कटकारस्थाने सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्षे  निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा शेलार यांनी दिला.

चार मोठे आरोप

शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कारस्थान करण्यासाठी चार प्रयत्न केले. पहिली कोरोनाची (Corona) लाट आल्याने मे महिन्यातच मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र ते अपयशी ठरले. त्यानंतर दुसरा डाव टाकला. महापालिकेची प्रभागरचना ही भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ते बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण तो प्रयत्नही फसला. तिसरा प्रयत्न म्हणजे निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलण्याचा डाव आहे. तर चौथा प्रयत्न म्हणजे ३० वॉर्ड जे आजन्म शिवसेना आणि काँग्रेसला जिंकताच येणार नाहीत, अशा ठिकाणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेवर टीका केली. ७० कोटींचा घोळ करूनही केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. पाच लाख मेट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? असा सवालही त्यांनी केला.

वरळीपुरती मर्यादित का?

मुंबई वरळीपुरती मर्यादित राहिलीय का? जम्बो कोव्हिड सेंटर, फुटपाथ, ट्रॅफिक सिग्नल सगळे काही वरळीतच होत आहे. वरळी सी-लिंकवरून गाडी निघते ते थेट वांद्रे पूर्वमध्ये निघते. पावसाचे पाणी टाळण्यासाठी पंप केवळ कलानगर सिग्नलमध्ये बसतात. मुंबई सगळ्यांची आहे, विकास सगळ्यांचा व्हावा ही आमची मागणी आहे, असेही शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button