११ जणांचा मृत्यू झाला तरीही शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कायम : अतुल भातखळकर

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : काही दिवसापूर्वी भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला आग लागली. या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तरीही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कमी झाले नाही. या आगीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही किंवा चौकशीसाठी सुद्धा कोणाला ताब्यात घेतले नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईतील खाजगी रुग्णालयांत खाटा अधिग्रहित करण्याच्या यादी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. यातून शिवसेनेच्या वरदहस्तामुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते, हे सिद्ध होते, असा आरोप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धे आणि पालिका कर्मचारी उपचार घेऊ शकतात, यासाठी सनराईज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा ‘रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल’ या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला, २५ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ १० दिवसात नाममात्र प्रक्रिया करून ६ मे २०२० ला परवानगी देण्यात आली. मागील दहा वर्षात झालेल्या अनेक आगीच्या घटना घडल्या. कमला मिल येथील दुर्घटना असो, सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग असो किंवा त्या अगोदरच्या अनेक घटनांमध्ये बेकायदेशीर रित्या बांधकाम करण्यात आलेले होते किंवा अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा केला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबई सुरक्षित शहर असल्याचे म्हणून स्वतःची पाट थोपटून घेणाऱ्या महापालिका क्षेत्रात २००८ ते २०१९ या ११ वर्षांत आगीच्या ५८ हजार ५८७ घटना घडल्या आहेत. यात ७०४ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ५ अग्निशमन अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. इतकी भयावह अवस्था असतानाही मुंबईत १ हजार ३००पेक्षा जास्त अनधिकृत रुग्णालये सुरू आहे. २९ मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर येऊनसुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. लोकांचा जीव गेला तरी, चालेल परंतु टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील, हे पाहण्यातच सत्ताधारी शिवसेना मशगुल आहे, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button