वडील मुख्यमंत्री झाले तरी आदित्यने गायकी नाही जोपासली; शिवसेनेचे अमृता फडणवीसांना उत्तर

Aaditya Thackeray - Amruta Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील बांगड्यांचा वाद चांगलाच चिघळला आहे; कारण यात फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली होती. फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरून त्यांना लक्ष्य केलं. “महिला या सर्वांत शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते; पण ही मानसिकता बदलायला हवी.” असे म्हणत आदित्य यांनी फडणवीसांना माफी मागण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही.

रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही; पतीनंतर पत्नी अमृता यांचाही आदित्य ठाकरेंवर पलटवार

पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते.” असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्वकाही आयतं मिळाल्याचं म्हटलं होतं. आता, अमृता फडणवीस यांच्या या टीकेला शिवसेनेच्या महिला प्रवक्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना प्रवक्त्या आणि विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी रिट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. “आदित्य ठाकरे यांनी आपले वडील मुख्यमंत्री झाल्यावर (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे.” असे म्हणत अमृता फडणवीस यांना गायनाच्या छंदावरून त्यांच्यावर निशाणा साधला.