मुंबईत वर्चस्व राखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

Mumbai vidhan Sabha

काँग्रेस चंचूप्रवेशाच्या प्रयत्नात
भाजपचे गड दिसतात मजबूत

मुंबई :- मुंबई शहर जिल्हा आणि पूर्व उपनगरातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे. युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेले झाुकते माप, आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चार्ज झालेले शिवसैनिक या पार्श्वभूमीवर शिवसेना आपले वर्चस्वव कायम राखणार की काँग्रेसला चंचुप्रवेशाची संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

युतीच्या जागावाटपात मुंबई शहर जिल्हा आणि पूर्व उपनगरातील १८ जागांपैकी तब्बल ११ जागा शिवसेनेकडे आल्या आहेत, तर केवळ सात जागांवर भाजप लढत देणार आहे. तर महाआघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे १४, राष्ट्रवादीकडे तीन आणि एका जागेवर समाजवादी पार्टीचा उमेदवार आहे. भायखळा आणि माहिमचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी युती विरुद्ध आघाडी अशा थेट लढतीची चिन्हे इथे आहेत. मुंबई महानगरातील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला या १८ जागांमधून जास्तीजास्त आमदार निवडून आणावे लागणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे वरळी विधानसभेतील लढत लक्षवेधी बनली आहे. इथे राष्ट्रवादीने बीआरएसपीच्या सुरेश माने यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली आहे. दलित वस्त्या विशेषत: मध्यमवर्गीय दलित मतदारांमध्ये माने यांची प्रतिमा चांगली असली तरी ही लढत एकतर्फीच असणार आहे. आदित्य ठाकरे यांचे मताधिक्याबाबतच उत्सुकता असणार आहे. वरळीतील ठाकरेंच्या उमेदवारीमुळे आजूबाजूच्या भायखळा, मुंबादेवी, शिवडी आणि माहिम या मतदारसंघातील शिवसेनेची पक्षसंघटनासुद्धा सक्रीय झाली आहे. त्याचा लाभ तेथील उमेदवारांना होणार आहे. शिवडीत शिवसेनेचे अजय चौधरी पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची अनुपस्थिती आणि शिवसेनेची पारंपारिक मते यामुळे या मतदारसंघात लढत सध्या तरी एकतर्फी आहे. काँग्रेसचे उदय फणसेकर आणि मनसेचे संतोष नलावडे शिवसेनेला तुल्यबळ लढत देतील, अशी शक्यता नाही. मनसेमुळे माहिममधील लढत मागील दोन निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यंदा शिवसेनेने सदा सरवणकर यांनाच रिंगणात उतरविले आहे. तर, मनसेकडून माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदिप देशपांडे मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. पाच वर्षात भाजपनेसुद्धा माहिममध्ये आपली ताकद वाढविली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेत, भाजपचा मतदार आपल्याकडे वळविण्याचे आव्हान सदा सरवणकर यांच्यासमोर असणार आहे. चेंबूरमध्ये विद्यमान सेना आमदार प्रकाश फातर्पेकर विरुद्ध काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे अशी लढत आहे. विक्रोळीत शिवसेनेचे सुनिल राऊत विरूद्ध राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ आमनेसामने आहेत. तर, भांडूपमध्ये अशोक पाटील यांचा पत्ता कट करून सेनेने रमेश कोरगांवकर यांना संधी दिली आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला आपला मतदार सोबत राहील याची काळजी घ्यावी लागणार आहे.

भाजपची स्थिती तुलनेत बरी आहे. कमी जागा लढवायच्या पण जास्त आमदार निवडून आणायचे हे युतीच्या राजकारणातील भाजपचे सुत्र राहिले आहे. १८ पैकी सात जागी भाजपचे उमेदवार असले तरी जवळपास सर्वच जागा पुन्हा भाजपकडे येतील अशी चिन्हे आहेत. काँग्रेसने नवखा उमेदवार दिल्याने मलबार हिल येथे मंगलप्रभात लोढा यांचे काम अगदीच सोपे झाले आहे. कुलाब्यात ऐनवेळी विद्यमान आमदार राज पुरोहित यांना बाजूला सारत राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकरांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भाई जगतापांसारखा तगडा उमेदवार दिला आहे. इथे तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. मात्र, भाजपचे संघटन किती कामाला लागते, यावर रार्वेकरांचे गणित अवलंबून असणार आहे. घाटकोपर पूर्वेत माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना भाजपने संधी दिली आहे. तर, सरदार तारासिंग यांच्याजागी मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा भाजप उमेदवार आहे. विद्यमान आमदारांना डावलल्याने समर्थकांमध्ये काहीशी नाराजी असली तरी निकालांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. घाटकोपर पश्चिमेतील विद्यमान आमदार राम कदम भलत्याच कारणांनी मध्यंतरी चर्चेत आले. चुकीच्या विधानांमुळे राज्यभरात त्यांच्याबद्दल नाराजी असली तरी मतदारसंघातील लाभार्थ्यांची संख्या त्यांना तारणारी आहे. सायन कोळीवाड्यात तमिळ सेल्वन यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. मात्र, नाराज इच्छुंकांकडून दगाफटका होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपवासी झालेले कालिदास कोळंबकर वडाळयातून पुन्हा एका विजयासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. स्थानिक पातळीवर नाराजी असली तरी अंतर्गत गटबाजीत अडकलेल्या काँग्रेसला त्याचा लाभ उठविता येईल, अशी शक्यता नाही. राजू वाघमारे यांच्याऐवजी काँग्रेसने ऐनवेळी शिवकुमार लाड यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेससाठी धारावीत विद्यमान आमदार वर्षा गायकवाड आणि मुंबादेवीत विद्यमान आमदार अमिन पटेल या दोनच जागी आशेचा किरण आहे. अमिन पटेल आणि वर्षा गायकवाड या दोघांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला आघाडी दिली होती. अमिन पटेल यांच्या मुंबादेवीत तब्बल तीस हजारांचा लीड होता. हे मताधिक्य तोडण्याचे मोठे आव्हान शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांच्यासमोर आहे. सायन कोळीवाड्यात गणेश यादव तुल्यबळ लढत देत आहेत. त्यामुळे येथील लढत अटतटीची झाली आहे. अंणुशक्तीनगरमधील लढाई राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांमुळे रंगतदार बनली आहे. मात्र, संजय दिना पाटील आणि सचिन अहिर यांचे पक्षांतर आणि सहकार्य शिवसेना उमेदवाराच्यामदतीला येण्याची चिन्हे आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी शिवाजीनगर – मानखुर्द मधील आपला गड वाचविण्यासाठी मैदानात आहेत. तर, भायखळ्यात वारिस पठाणांसमोरही आव्हान आहे. दोन्ही उमेदवारांनी पडद्यामागून सहकार्याची रणनिती राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे. मुस्लिम मते फुटु नयेत यासाठी झालेली ही छुपी आघाडी यशस्वी होते का,हे निकालातून स्पष्ट होईल.

पक्ष विद्यमान आमदार
शिवसेना ७
भाजप ७
कॉंग्रेस २
राष्ट्रवादी ०
एमआयएम १
सपा १