शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोन बडे नेते शिवबंधन बांधणार

Vasant Gite - Sunil Bagul

नाशिक :- महापालिका निवडणूकीला काही महिने शिल्लक राहिले असतांना शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करुन शिवबंधन हाती बांधणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी कालच (7 जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांशी तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेश निश्चित करण्यात आला. आज (8 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा होईल.

नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सानप गेल्याची उणीव भरुन काढणार
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पंचवटी परिसरात राहतात. पंचवटी परिसरात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जात होते. हीच पोकळी भरुन काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा नाशिकचा दौरा केला. पंचवटी परिसरातून तब्बल 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने ही फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत जाणाऱ्या वसंत गितेंना मनसेची ऑफर, गितेंचेही मनसेला तोडीस तोड उत्तर…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER