आरे खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार

नागपूर : आरे जंगल आहे असे घोषित करून शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. आता आरेतील आदिवासी पाडे स्थलांतरित करून व हा पट्टा निवासी करून खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे, असा आरोप भाजपाचे आ. आशिष शेलार यांनी केला आहे.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेनेचे आ. रवींद्र वायकर यांनी सूचना केली की, आरेच्या जागेतील आदिवासी पाडे आणि अनधिकृत बांधकामे पुनर्विकसित करण्यासाठी आरेतील एका मोठ्या भूखंडावर विकास आराखड्यात आरक्षण करून तिथे घरे पुनर्विकसित करा. यावरून आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर आरेची जागा लाटण्याचा आरोप केला.

आशिष शेलार म्हणाले की, आरेतील नागरिकांना चांगले रस्ते, वीज, पाणी या नागरी सोई मिळणार असतील तर आमचा विरोध नाही; पण त्यांच्या संस्कृती आणि कलेचेही जतन झाले पाहिजे. त्यांना आदिवासी तेथून हटवून ती जागा विकासकांना देण्याचा शिवसेनेचा डाव असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही.

आरे जंगल आहे असे कारण देऊन, मुंबईसाठी आवश्यक असलेल्या मेट्रो कारशेडचे काम थांबवणाऱ्या शिवसेनेचे आमदार आरेतील भूखंड निवासी करा, अशी मागणी करत आहेत ही भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप शेलार यांनी केला.