शिवसेनेची पश्चिम बंगाल निवडणुकीतून माघार, मात्र ममता दीदींना पाठिंबा

मुंबई :- विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) तारीख जवळ येऊ लागल्याने पश्चिम बंगालमधील (West Bengal elections) राजकारण आणखीनच तापू लागले आहे. त्यातच महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या शिवसेनेने या निडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शिवसेनेने मोर्चेबांधणीलाही सुरूवात केली होती. आता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भातमोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेना पश्चिम बंगाल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असले तरी शिवसेनेने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन या निर्णयाबाबतची अधिकृत घोषणा केली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला.

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया हे सर्व आयुध ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

यापूर्वी शिवसेनेने दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु यंदा पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यात ठाकरेंची भेटही घेतली होती.

ही बातमी पण वाचा : बाबरीबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे उद्धव ठाकरेंवर भडकले अबू आझमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER