शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार – नीलम गोऱ्हे

मुंबई :- २१ तारखेला मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी काही संस्थांचे एक्झिट  पोल आले. यानुसार राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येणार हे निश्चितपणे सांगण्यात येत आहे. एक्झिट  पोलच्या निकालानंतर नेत्यांनीही या निकालावर भाष्य केले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेला १००पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेना यंदा शंभरी पार करणार असे म्हटले आहे.

२४ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. निकालासाठी आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सर्व नेत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतदानानंतर राजकीय वर्तुळात सत्ता कोणाची येणार यावर तर्कवितर्कांना  ऊत आला आहे. तर अनेकांनी यंदाही भाजप-शिवसेना युतीचेच सरकार येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : …मात्र, भाजपने मुक्ताई नगरच्या शिवसेना बंडखोरांवर कारवाई केली नाही – एकनाथ खडसे

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला किती जागा मिळणार यावर पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे. कसबापेठ येथील पवळे चौकात दिवाळी सणानिमित्त ना नफा ना तोटा फराळ स्टॉलचे उद्घाटन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे   म्हणाल्या, मागील पाच वर्षांत सरकारने चांगलं काम केल्याचं, अनेक ठिकाणी नागरिकांनी पुढे येऊन बोलून दाखविलं आहे. त्यामुळे महायुतीला जनता पुन्हा काम करण्याची संधी देणार आहे. हे लक्षात घेता, शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेने निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने, पुढील पाच वर्षांत  पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.