कौनसी हस्तीया कब डूब जाएंगी’ हे शिवसेनेला लवकरच कळेल, राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

Prasad Lad and Sanjay Raut

रत्नागिरी : “कौनसी हस्तीया कब डूब जाएंगी’ हे शिवसेनेला (Shivsena) 2022 ते 2024 या दरम्यान नक्कीच कळेल, काल भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी जे सांगितलं ते सत्य होतं. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व कधी खोटं बोललेले नाही. या महाराष्ट्रातील जनतेला कोण खोटं बोललं हे चांगलंच माहिती आहे. ज्यांनी हिंदुत्व विकलं त्यांनी आम्हाला हस्तिया आणि नेतृत्वाबद्दल शिकवू नये, असे जोरदार प्रत्युत्तर भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) विधानावर दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कुठलाही शब्द दिला नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फटकारलं.

इतकंच नाही तर प्रसाद लाड यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या पवित्र खोलीत झालेल्या चर्चेबद्दल आम्ही कधीच खोटं बोलणार नाही, असं म्हणाऱ्या शिवसेना नेते अरविंद सावंत यांनाही उत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत बसून कायम काँग्रेसला विरोध करत राहिले, शरद पवार यांच्या नेतृत्वाला कायम विरोध केला. त्याच खोलीत बसून त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गटबंधन करण्याचे काम शिवसेनेने केलं. भारतीय जनता पार्टीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत. त्यामुळे ज्या शिवसेनेनी बाळासाहेबांच्या रुममध्ये बसून स्वत:ची तत्वनिष्ठा, पक्ष संघटना, हिंदुत्व विकलं त्या अरविंद सावंत यांनी खोलीची गोष्ट करू नये, असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला.

शिळ्या कढीला ऊत कशाला आणता हे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा प्रसाद लाड यांनी जोरदार उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते, गेले वर्षभर ते महाराष्ट्रात आले नव्हते. सत्ता संर्घषानंतर एक वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यांच्या तोंडून याचे उत्तर द्यायला हवं होतं. त्यामुळे ज्यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा झाली असं बोललं होते. त्याबद्दल महाराष्ट्राच्या भूमीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत स्पष्ट केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

नारायण राणेंप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी २२ वर्ष वाट पाहावी लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले होते. त्याला प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं. नवाब मलिकांचे हे वक्तव्य म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER