‘जगदंब’ तलवार परत न करणाऱ्या इंग्लंडला महाराष्ट्रात क्रिकेट खेळू देणार नाही : शिवसेना

Shivsena - England cricket Team

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत न देणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात क्रिकेट खेळू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने छत्रपतींच्या घराण्याची जगदंब तलवार इंग्लंडने परत द्यावी या मागणीकडे भारत सरकार, इंग्लंडचे सरकार आणि इंग्लडच्या राणीचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

याबाबत पत्रकात माहिती देण्यात आली आहे की, शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी ‘जगदंबा’ तलवार आज इंग्लडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) हे अल्पवयीन (११ वर्षांचे) असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) भारत भेटीवर आला असता सन् १८७५-७६ मध्ये त्यांना जबरदस्तीने भेट म्हणून दिली होती. ती जगदंबा तलवार भारतात परत यावी अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे.

ही तलवार परत आणण्यासाठी अनेक नेत्यांनी या पूर्वी घोषणा केल्याची आठवण शिवप्रेमींनी करुन दिली आहे. यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यापासून ते कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आम्ही ही तलवार भारतात परत आणू अशी घोषणा केली होती.

जगदंबा तलवार भारताला परत द्यावी यासाठी इंग्लडच्या राणीचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीत क्रिकेट खेळण्यास विरोध करणार आहोत, असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER