कोल्हापूर महापालिकेवर एकहाती भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा संकल्प

Shiv Sena - Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोरोनाचा (Corona) वाढलेला प्रादुर्भाव आता कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची (Kolhapur Municipal Corporation) लांबणीवर पडलेली निवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी मेळावा घेत महापालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच, असं राजेश क्षीरसागर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं. जय-पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने सुरुवात करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिली असून, गेल्या दोन पदवीधर आणि महापालिका निवडणुकीचा अनुभव सार्थकी लावण्याची संधी येत्या निवडणुकीत मिळणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहून, प्रसंगी त्यागाची भूमिका घेऊन पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा घरोघरी प्रचार करावा. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्ष आदेशाचे तंतोतत पालन करावे, यासह महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी दिल्या.

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल, या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कोरोना परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी ठरले असून, राज्यास प्रगतिपथावर नेण्याचे काम शिवसेनेने करून दाखवले आहे. शिवसेनेचा इतिहास त्यागाचा असून त्यांचे ज्वलंत उदाहरण नूतन परिवहन सभापतींची निवड आहे. शिवसेनेच्या माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलेल्या त्यागाबद्दल त्यांना पुढील काळात निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल.

गेल्या दोन्ही पदवीधर निवडणुकीच्या विजयात शिवसेनेचा मोलाचा वाटा आहे. गत निवडणुकीत शिवसेनेकडून विक्रमी झालेल्या पदवीधर मतदार नोंदणीच्या आधारावर शिवसैनिकांनी मतदारांपर्यंत पोहचावे. पक्ष आदेशांप्रमाणे दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्यात योगदान द्यावे.

गेल्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे २५-३० उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यागाची भूमिका ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिक प्रचार करून त्यांना विजयी करावं. याच त्यागाच्या भूमिकेतून शिवसेनेचा महापौर झालेला आपल्याला बघायला मिळेल. कोणालाही दोष न देता सकारात्मक कामातून पुढे जाऊ या. गेल्या १० वर्षांत उभा केलेल्या विकासकामांच्या डोंगराची शिदोरी घेऊन मतदारांपर्यंत पोहचा, मतदारांना शिवसेनेच्या कामाचे महत्त्व पटवून द्या आणि आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना केल्या.

दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीची सत्ता आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं एकला चलो रेची भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढणार असली तरी निकालानंतर पुन्हा आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, काँग्रेसनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER