हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वावरूनच कोंडी

शिवसेनेचे राजकारण भावनांवर चालते. कधी शिवसेना हिंदुत्वाला हात घालते आणि हिंदूंच्या भावनांशी खेळते भगवा, जय भवानी-जय शिवाजी हे ब्रँड शिवसेनेकडे आहेतच. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जागवलेले हिंदुत्व शिवसेनेला कामी पडते. हिंदुत्वाकडून शिवसेना अचानक मराठी पणाकडे झुकते मग तिला मराठी माणसांचा कळवळा येतो. कधी शिवसेनेला अचानक वाटू लागते की मुंबईचे तुकडे केले जात आहेत.  तसे काहीही नसते. मुंबईचे तुकडे करण्याची दूरदूरपर्यंत सुतराम शक्यता नसते, पण शिवसेना उगाच एक चित्र निर्माण करते की मुंबई तोडण्याचा डाव आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणाऱ्यांनो लक्षात ठेवा शिवसेना तुमच्या छाताडावर उभी राहील अशी भाषा केली जाते.मुंबईतल्या मराठी माणसाला ही भाषा खूप आवडते, मग या मराठी माणसाला असे वाटू लागते की आपली एकमेव तारणहार शिवसेनाच आहे.

हीच शिवसेना मराठी माणसांना कधी गुजरात्यांविरुद्ध तर कधी दक्षिणत्यांत्विरुद्ध सावध करत राजकारण करते आता शिवसेनेला एकूणच भावनिक राजकारण करण्याच्या काही मर्यादा निश्चितच येतील ज्या त्यांच्यासाठी भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत. कारण भावनिक राजकारण हा शिवसेनेचा आत्मा आणि दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन करून शिवसेना  या आत्म्याची गळचेपी करेल असे वाटते. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पूर्वीसारखे परिणामकारक राजकारण आता करता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जाहीर केले की हिंदुत्वापासून कधीही दूर जाणार नाही पण राज्यातील जनता हे जाणते की नुसते जाहीर करण्याने काहीही होणार नाही.

काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांसोबत जाऊन आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द किमान समान कार्यक्रमात स्वीकार करून शिवसेनेने केव्हाच हिंदुत्वाची धार कमी केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्व सोडणार नाही असे ठाकरे कितीही सांगत असले तरी त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक पडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पूर्वीसारखा परिणाम हिंदू मतदारांवर होणार नाही. अनेक भावनिक मुद्दे असे आहेत की ज्यावर शिवसेना पद्धतशीरपणे आपली पोळी भाजत आली आहे.त्यातील एक म्हणजे मुस्लीम आरक्षण. या आरक्षणाला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. मात्र आता मुस्लिम  व्होटबँकेवर ज्यांची मदार आहे असे काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांच्या मदतीने सरकार चालवताना मुस्लिम आरक्षणाबाबत शिवसेनेला विरोधाची पूर्वीसारखी टोकदार भूमिका घेता येणार नाही.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची जोरदार मागणी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. त्यात दलितांची बाजू प्रभावीपणे मांडत राजकारण करणारे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते देखील आहेत. आधीच्या सरकारने हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे आधी बघू असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्त वेळ मारून नेली आहे.कोरेगाव-भीमा हिंसाचार मुख्यत्वे हिंदू विरुद्ध दलित आणि त्यातल्यात्यात हिंदूंमध्ये मराठा विरुद्ध दलित असा होता. आता त्यात बहुतांश गुन्हे हे दलित कार्यकर्त्यांविरुद्ध आहेत. मात्र ते हिंसक घटनांवरून दाखल केलेले असल्यामुळे मागे घेऊ नयेत अशी स्थानिक मराठा समाजात  भावना आहे.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेसाठी हे गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो.

कट्टर हिंदुत्ववादी अशा सनातन संस्थेवर बंदी आणा अशी मागणी आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करू लागले आहेत. भाजप व शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. गेल्या पाच वर्षाच्या काळात फडणवीस सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे टाळले. आता काँग्रेस राष्ट्रवादीतील धर्मनिरपेक्ष किंवा कट्टर हिंदुत्वविरोधी नेत्यांच्या मागणीनुसार उद्धव ठाकरे यांनी सनातन संस्थेवर बंदी आणण्याची भूमिका घेतली तर शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा  भलेमोठे प्रश्नचिन्ह लागेल. मित्रपक्षांच्या दबावासमोर झुकायचे की कट्टर हिंदुत्वाला चिकटून राहायचे हा प्रश्न  केवळ सनातन  संदर्भातच नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेला सतावत राहील. त्यामुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होऊ शकते.

दिग्विजय पासिंग पासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची स्वातंत्र्यलढ्यातील  भूमिका आणि गांधी हत्येसंबंधाने नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे शिवसेनेने मात्र सावरकर यांना भारतरत्न दिलेच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत सरकार चालवताना या भूमिकेवर शिवसेना कितपत ठाम राहू शकेल हा प्रश्न आहे. एकीकडे आम्ही कट्टर हिंदुत्व सोडणार नाही, आमचा भगवा रंग  कोणत्याही लॉन्ड्री धुवायला गेला तरी फिका पडणार नाही असे म्हणत राहायचे आणि दुसरीकडे हिंदुत्वाशी काडीमोड घेत राहायचे यातून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतचा विरोधाभास वाढत राहील.