शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंदच; पवार-प्रशांत किशोर भेटीचे शिवसेनेकडून स्वागत

मुंबई : आज राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देशातील यूपीएचं नेतृत्व, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर उभं करण्याचं आव्हान आणि यूपीए-२ बाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत यूपीए-२ चं नेतृत्व करण्यावरूनही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. प्रशांत किशोर यांच्या भेटीचं शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलं आहे. तसेच महाविकास आघाडी शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलं आहे.

अरविंद सावंत म्हणाले, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एकतर्फी कारभार सुरू आहे. देश्याच्या हितासाठी सक्षम विरोधी पक्ष आणि पर्यायी नेतृत्व आवश्यक झालं आहे. काँग्रेसच्या सतत होत असलेल्या वाताहतीमुळं भाजपचा फायदाच झाला. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू नेता असेल तर ते शरद पवार आहेत. मराठी माणूस राष्ट्रीय स्तरावरील नेता असावा अशी इच्छा बाळासाहेबांचीही होती. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात अस्तित्वात आली आहे. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत म्हणाले. शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे शरद पवारांनीही शिवसेनेचे कौतुक करत विश्वासपात्र पक्ष असल्याचे नमूद केले आहे, असंही सावंत यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button