कोल्हापूर : शिवसेनेला हवं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद

Shivsena-Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 2 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचे 14 राष्ट्रवादीचे 11 आणि शिवसेनेचे 10 सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी 34 सदस्यांची गरज आहे. मागील वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेत दोन गट पडले होते.

सात सदस्यांच्या एका गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र आता कोणत्याही स्थितीत जिल्हापरिषद काबीज करायची या नात्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने मोट बांधली आहे. शिवसेनेच्या 10 सदस्यांची मते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन ऐकून घेतली. दरम्यान, कोल्हापूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची दुधवडकर यांनी चर्चा केली. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सोबत जिल्हापरिषदेत काम करेल.

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतही आता महाविकास आघाडीची शक्यता

मात्र शिवसेनेला अध्यक्षपद तसेच दोन विषय समितीचे सभापती पद द्यावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेनेच्या या मागणीवर आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी एकत्रित बैठक घेऊन उद्या शुक्रवारपर्यंत निर्णय देऊ, असे सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घातपात नको, यासाठी सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांना सोयी वर पाठवले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार अध्यक्षपद काँग्रेस ला मिळावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.