बाळासाहेबांनंतरची शिवसेना दगाबाज – मनसेची टीका

Sandeep Deshpande & Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेनेने २०१७ ला मराठी माणसांसोबत आणि हिंदूंसोबत दगाबाजी केली. बाळासाहेबांनंतरची, म्हणजेच आताची शिवसेना ‘दगाबाज शिवसेना’ आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली.

मनसे कोणतेही काम सुपारी घेल्याशिवाय करत नाही, असा टोमणा काल शिवसेनेने मारला होता. या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले – २०१७ ला महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून शिवसेनेने ताकदीची चाचपणी केली. त्यावेळी, मुख्यमंत्री तर सोडा महापौरही निवडून आणू शकत नाही हे त्यांना समजले. त्यावेळी मराठी माणसांसोबत आणि हिंदूंसोबत दगाबाजी करण्याचे काम शिवसेनेने केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची, म्हणजेच आताची शिवसेना ‘दगाबाज शिवसेना’ आहे.

भाजपाला साथ देणार का, याच्या उत्तरात ते म्हणाले – भाजपासोबत जाण्याचा निर्णय अद्याप राज ठाकरे यांनी घेतला नाही. याबाबत शिवसेनेच्या मनात भीती आहे. त्यांनी मनसेसोबत कायम दगाबाजी केली. २०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं आमच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर तेच प्रस्तावावरून फिरले. आमचे सहा नगरसेवक त्यांनी त्यावेळी चोरले आणि भावाच्याच पाठीत खंजीर खुपसला. २०१९ ला भाजपासोबत निवडणूक लढवली आणि त्यांच्यासोबतही दगाबाजी केली. त्यामुळे दगाबाज कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

शिवसेनेकडूनच प्रस्ताव
२०१७ मध्ये अखेरच्या वेळी राज ठाकरे यांनी फोन केले. परंतु सुरुवातीचे प्रस्ताव शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या एका नातेवाइकाने आणला. त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. आम्ही युती तोडणार आहोत. त्यानंतर आपण यावर विचार करू, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आला. त्यानंतर आमच्या पाठीत शिवसेनेकडून खंजीर खुपसला गेला. हे दगाबाज लोक आम्ही सुपारी घेतली असे आम्हाला म्हणणार का? असा सवालही त्यांनी केला. आम्ही जे काही केले ते उघडपणे, असे ते म्हणाले.

…म्हणून शिवसेना अस्वस्थ
राज ठाकरेंच्या कृष्णकुंजकडे जनता नव मंत्रालय म्हणून पाहते आहे. ते त्यांचे प्रश्न घेऊन राज ठाकरे यांच्याकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे शिवसेना अस्वस्थ आहे. म्हणून ते आमच्यावर आरोप करत आहेत. पालिका निवडणुका आमच्यासमोरचा मुख्य प्रश्न नाही. लोकांना जो त्रास होतो त्याला दिलासा कसा देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेत ज्यांचा जीव अडकला आहे त्यांच्यासाठी महापालिका निवडणूक महत्त्वाची असू शकते. जसा पोपटात राक्षसाचा जीव अडकलेला असतो तसा शिवसेनेचा जीव महापालिकेत अडकला आहे, असा टोमणा देशपांडे यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER