शिवसेनेनं आज मान्य केले, ‘शरद पवारच’ ‘ठाकरे’ सरकारची लाईफलाईन

Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले असताना दुसरीकडे राजकीय गोंधळ उडाल्याचे मागील आठवडाभरापासून दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले असून कोरोनाला नियंत्रणात आणण्यात ‘ठाकरे’ सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा तक्रार विरोधकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे आघाडीकडून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार कुठल्या उपाययोजना राबवून कोरोनाला नियंत्रणात ठेवत असल्याचे पटवून दिले आहे. हे सरकार राहणार की कोसळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या सगळ्या घडामोडीत एका नेत्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी.

ठाकरे सरकार कोसळणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पवारांनी आघाडीच्या नेत्यांशी समन्वय साधून हे सरकार कायम राहण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ‘ठाकरे’ सरकारची लाईफलाईन शरद पवारच आहेत हे आज शिवसेनेसुद्धा मान्य केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात म्हटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ‘ठाकरे सरकार’ स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते. सरकारच्या भवितव्याविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर आहे, हे त्यांचे म्हणणे कायम आहे.” संजय राऊतांच्या या विधानावरून आज शिवसेनेनेही पवार हेच ‘ठाकरे’ सरकारची लाईफलाईन आहे हे एकप्रक्रारे स्पष्ट केले आहे.

तसेच महाविकास आघाडीचे सरकार चालवणे ही तीन पायांची शर्यत आहे, पण ज्यांनी आघाडीचे सरकार उत्तम चालवून दाखवले असे श्री. शरद पवार हे ठाकरे सरकारचा गोवर्धन करंगळीवर तोलून आहेत. त्यामुळे अंतर्विरोधाचे त्रांगडे होणार नाही व मतभेदांची घोंगडी टिकणार नाहीत. असे म्हणत राऊत यांनी पवारांमुळेच ‘ठाकरे’ सरकार टिकून असल्याचे इशाऱ्यात सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER