
लखनऊ : उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षानंतर आता शिवसेनेनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.
यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत. शिवसेनेचे उत्तरप्रदेश प्रदेशप्रमुख अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा बैठका घेऊन पक्षाच्यावतीने प्रभारी नियुक्त केले जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे. निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे याचे धडे देण्यात येणार आहे.
तेथून परत आल्यानंतर पूर्वांचल, पश्चिम मंडळ विभागात प्रशिक्षण होईल. यानंतर उमेदवारांची निवड करून त्यांना मैदानात उतरवले जाईल. दरम्यान, काँग्रेसशी चर्चा झाल्यास त्यांच्याशी युती केली जाणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल सिंह म्हणाले की, आमचे संघटन संपूर्ण राज्यात चांगलं काम करीत आहे.
मागील निवडणुकीत १६ जिल्हा पंचायत सदस्य आणि १५० हून अधिक प्रधान निवडले गेले होते. काँग्रेससोबत युती करून पंचायत निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत १६ जानेवारीला राज्यात दाखल होणार आहे. त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्रात आमची युती आहे. येथेदेखील असू शकते. त्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. उर्वरित बैठकीत निर्णय होईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला