शिवसेना बिहारमध्ये ३० ते ५० जागा लढवणार , उद्धव ठाकरे प्रचाराला जाणार ? संजय राऊतांचे संकेत

Sanjay Raut - CM Uddhav Thackeray

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) ३० ते ५० जागा लढणार आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. बिहारमध्ये रामविलास पासवान यांचा पक्ष भाजप (BJP) आघाडीतून बाहेर पडला असून त्यात आता शिवसेनाही उमेदवार देणार असल्याने हिंदू मतांमध्ये फूट पडणार असल्याची दाट शक्यता आहे .

बिहारचे शिवसेना नेते आणि पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची विनंती केली होती. तसेच हिंदूत्व आणि भूमिपूत्रांच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचंही या नेत्यांनी सांगितलं. त्याबाबत बोलताना राऊत यांनी आज हे संकेत दिले. माजी पोलीस अधिकारी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? या प्रश्नावर त्यांनी दोन दिवस थांबा. सर्व चित्रं स्पष्ट होईल, असे सांगितले .

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला जाण्याबाबतची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत माहीत देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे बिहारमध्ये प्रचाराला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER