शिवसेना ‘चोर कंपनी’ : ठाणे महापालिकेच्या सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची घोषणाबाजी

Shivsena-NCP

ठाणे :-  एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये एकत्र असताना दुसरीकडे मात्र स्थानिक स्तरावर अद्यापही कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहे. आज ठाणे महापालिकेचा २०२१-२२  या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यात आला. परंतु यावेळी अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचा उल्लेख ‘चोर कंपनी’ करत आयुक्तांसमोर घोषणा देण्यात आल्या.

गेल्या वर्षी विकासकामं ठरवताना शिवसेनेने डावललं असल्याचा आरोप भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावेळी केला.ठाणे पालिकेत गेल्या वर्षी ३ हजार ७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र, यंदा करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले  आहे. यंदाचा अर्थसंकल्प २ हजार ८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. जवळपास ९०० कोटींनी अर्थसंकल्प कमी झाला आहे. ठाणेकरांवर करवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यंदाचा अर्थसंकल्प वास्तववादी, काटकसरीचा असल्याचं पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी म्हटलं आहे.

ठाणे (Thane) महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेलं नाही. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे महापालिकेच्या खर्चात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा ३ हजार ७८० कोटी रकमेचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. ४९.३० लाख अखेरच्या शिलकेसह १ हजार ८४२.११  कोटी महसुली खर्च आणि १ हजार ९३७.४० कोटी भांडवली खर्चाचा हा अर्थसंकल्प होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER