शिवसेनेची पंचाईत; देवेंद्र यांचा मार्ग मोकळा

badgeविधानसभेची मुदत संपायला आता फक्त ४८ तास उरले आहेत. जे काही करायचे ते ह्या ४८ तासांत करायचे आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आज घमासान सुरू होते. खूप काही घडले आणि उद्या आणखी काही घडेल. पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आता राष्ट्रपती राजवट नाही. भाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटायला जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उद्याच आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना सोबत आली तर चांगलेच, नाही आली तरी भाजप आता मागे वळून पाहणार नाही. परवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात आणि नंतर मिळणाऱ्या वेळेत ते बहुमत जमवायच्या कामाला भिडतील.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना देणार मानाचे पद; सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत निम्मा वाटा ह्या मागणीवर ठाम असताना भाजप पुढे निघाला आहे. हे कसे घडले? राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी भाजपला सिंहासनाचा राजमार्ग मोकळा करून दिला. ‘राष्ट्रवादीला विरोधात बसायचा कौल मिळाला आहे. आम्ही विरोधात बसणार’ असे शरद पवारांनी आज पत्रपरिषद घेऊन जाहीर करून शिवसेनेची पंचाईत करून टाकली. राष्ट्रवादीच्या जोरावर उद्धव उड्या मारत होते. पवारांनीच हात वर केल्याने शिवसेनेच्या हातात आता काही उरले नाही. सोनिया गांधी आधीही शिवसेनेसोबत बसायला तयार नव्हत्या. त्यामुळे प्रश्नच संपला. उद्धव यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. एकट्या पडलेल्या उद्धव यांना आता आपली ठाकूरकी टिकवण्यासाठी भाजपसोबत मागेपुढे बसावेच लागेल. गेल्या वेळी दीड महिन्यांनी शिवसेना सरकारमध्ये सामील झाली होती. आता देवेंद्र दोन-चार जास्त खाती देऊन सेना आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांचे तोंड बंद करील. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही युती वाचवली, असे सांगून उद्धव पुन्हा पाच वर्षे सत्तेत राहून भांडायला मोकळे होतील.

उद्धव यांना पटवणे सोपे नव्हते आणि नाही. उद्धव यांनी वाढवत नेलेल्या दबावाला मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस बळी पडले नाहीत. चहूकडून घेराबंदी आणि टीका सुरू असताना त्यांनी तब्बल १४ दिवस संयम बाळगणे सोपे नव्हते. देवेंद्र  परीक्षेत पास होत आहेत. काल राष्ट्रपती राजवट अटळ दिसत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एंट्री मारली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक नागपूरच्या संघ दरबारात हजेरी लावून सरसंघचालक मोहन भागवत यांचे मार्गदर्शन घेतले. कुठल्याही परिस्थितीत युती तोडू नका, असा सल्ला भागवत यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. त्यानंतर हिंमत वाढलेल्या भाजपने सरकार स्थापनेच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. फडणवीस दोन दिवसांत शपथ घेणार असले तरी शिवसेना आत येईपर्यंत दीड-दोन महिने टेन्शनचे राहणार आहेत.