आता शिवसेनेला धक्का; सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

shiv-sena-suryakant-dalvi-may-join-bjp-meet-cm-devendra-fadnaivs

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूर्यकांत दळवी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत .

सूर्यकांत दळवी यांनी भाजपप्रवेशाबाबत स्वतः भाष्य केले . प्रसारमाध्यमांशी बोलताना सूर्यकांत दळवी यांनी सांगितले की, माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. शिवसेना पक्षाने माझी दखल घेतली नाही तर मला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे दळवी यांनी सांगितले. सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते .

रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे .

त्यामुळे सूर्यकांत दळवी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना दापोली मतदारसंघातून उमेदवारी द्यायलाही विरोध दर्शवला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळीही सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत .