
भिवंडी : भिवंडी पंचायत समितीत शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असतानाही समितीच्या सभापतीपदी भाजपच्या ललिता प्रताप पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसह महाआघाडीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे तालुक्यातील नेते भाजपच्या हाती पंचायत समिती का देतात असा प्रश्न आता सामान्य शिवसैनिकांना पडला असून सेनेच्या वरिष्ठांच्या या राजकीय रणनीतीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीचे नाराजी आहे.
भिवंडी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी शुक्रवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सभापती निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत भाजपच्या ललिता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी ललिता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे.
भाजपाच्या कुरघोडी राजकारणाला वैतागून शिवसेनेने राज्यात महाआघाडी सोबत घरोबा करून भाजपाला सत्तेपासून दूर केले आहे. मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केल्याचे शुक्रवारी पुन्हा दिसून आले आहे. भाजपा व सेनेने युतीच्या माध्यमातून सभापती व उपसभापती पद अवघे तीन तीन महिन्यांकरीता वाटून घेतले असल्याचे समजत असून त्यानुसार भाजपाच्याच सभापती संध्या नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला