शिवसेनेने ‘नागरिकत्व विधेयका’विरोधात एमआयएमसोबत यावे : इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

मुंबई :- शिवसेना आता काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राज्याच्या सत्तेत आली आहे. तेव्हा शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याच्या मुद्यावर एमआयएमसोबत येण्यास काही हरकत नाही, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात एमआयएमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी औरंगाबाद येथे रविवारी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

खासदार जलील यांनी विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘‘मोदी आणि शहा यांनी बहुमताच्या जोरावर देशात आपण करू तोच कायदा, या पद्धतीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे.

“महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार”, आठवलेंचा दावा

सुरुवातीला तीन तलाक, त्यानंतर ३७० कलम आणि आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले आहे. त्याचेही पडसाद संपूर्ण देशात आता उमटत आहेत. आसामनंतर केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. या कायद्याद्वारे विशिष्ट घटकाला त्रास देण्याचा स्पष्ट उद्देश केंद्राचा दिसतो आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणे योग्यच आहे, असे मतही त्यांनी मांडले. या विधेयकामुळे आता विनोदातही आम्हाला पाकिस्तानात जावे लागेल, असे बोलले जात आहे. त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी त्याआडून मोदी आणि शहा हे भय पसरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

‘‘तुम्ही काँग्रेसला साथ देणार का,’’ या प्रश्नावर थेट उत्तर न देता,आम्ही पक्षीय भेद विसरून सरकारविरोधात कोणासोबतही रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.

दरम्यान एमआयएमकडून येत्या २० डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.