टिळकांच्या काळी कॉंग्रेस ध्येय, कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर फुटली; शिंदे, पायलट फुटतात अशी फूट नव्हती – शिवसेना

Lokmanya Tilak

मुंबई: लोकमान्य टिळकांचा (Lokmanya Tilak) आज स्मुतीदिन आहे. सामनाच्या अग्रलेखातून आज टिळकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. टिळकांच्या काळातील पत्रकारिता आणि राजकारण यावर आजच्या सामनातून (Saamana Editorial) भाष्य केले आहे.

लोकमान्य टिळकांना जाऊन 100 वर्षे झाली, पण शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान, देशभक्ती या चतुःसूत्रीतून टिळक जिवंत आहेत. ते मर्दांचे लोकमान्य होते. त्यांनी स्वतः हाती शस्त्र धरले नाही, पण क्रांतिकारकांचे ते ‘केसरी’ होते. टिळकांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.

टिळकांच्या काळातील पत्रकारिता व राजकारण याचे वर्ण करताना शिवसेना म्हणते की, लेखणीच्या टोकाने व मषीपात्राच्या सहाय्याने पांढऱयावर नुसते काळे करण्याचा आमचा इरादा नाही.’’ टिळकांनी तेव्हा जे सांगितले ते आजच्या काळातही लागू पडते हे महत्त्वाचे. टिळकांनी तोंडपुंजेपणा केला नाही. राज्यकर्त्यांचा तोंडपुंजेपणा हा प्रकार देशाच्या हितास अपायकारक होय असे टिळकांचे मत होते.

लोकमान्यांना शिक्षा झाली. त्यांना सात वर्षे मंडालेत नेऊन टाकले. याच काळात काँग्रेसला तडे गेले, पण काँग्रेस ध्येय, कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर फुटली. आज ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट वगैरे मंडळी फुटतात त्यातली ही फूट नव्हती. अशा शब्दांत टिळकांच्या काळातील राजकारण कसे ध्येयाने झपाटलेले होते हे शिवसेनेने आजच्या सामनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आजचा सामना –

स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक यांनी मर्दानगी व शौर्य आणले**. ते शौर्य आजही या ना त्या कारणाने दिसते आहे. त्या शौर्याचे मूळ टिळकांनी केलेल्या पेरणीत आहे. टिळकांना जाऊन 100 वर्षे झाली, पण शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान, देशभक्ती या चतुःसूत्रीतून टिळक जिवंत आहेत. पुतळे व स्मारकांची गरज मर्दांना लागत नाही. टिळक तसेच होते. टिळक तेल्यातांबोळय़ांचे पुढारी जरूर होते. मर्दांचे लोकमान्य जास्त होते. त्यांनी स्वतः हाती शस्त्र धरले नाही, पण क्रांतिकारकांचे ते ‘केसरी’ होते. टिळकांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.

टिळक जाऊन शंभर वर्षे झाली, पण राम, कृष्ण, शिवाजीराजे यांच्याप्रमाणे टिळक आपल्यातच आहेत. टिळक जन्मले कोकणात, त्यांनी राजकारण केले पुण्यातून, देह ठेवला मुंबईच्या सरदारगृहात, पण हा सिंहपुरुष इंग्लंडपासून कराचीपर्यंत स्वराज्य व स्वाभिमानासाठी गर्जना करीत फिरत होता. ‘जेव्हा सारे जग निद्रावस्थेत पहुडलेले असते तेव्हा संयमी महापुरुषच जागृतावस्थेत असतात’ ही गीतेची धारणाच टिळकांच्या जीवनाचे मर्म होते. टिळक राजमान्य नव्हते म्हणून ते लोकमान्य ठरले. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांनी देह ठेवला. टिळकांच्या आजारपणात देशाच्या समाजमनाच्या हृदयाचे ठोके मंद झाले होते व त्यांच्या निधनाच्या बातमीने देश काही काळ निस्तेज झाला.

त्यानंतर 27 वर्षांनी देश स्वतंत्र झाला, पण त्या विजयाची पायाभरणी टिळकांनी करूनच ठेवली होती. “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” असे इंग्रजांच्या तोंडावर सांगणारा व परिणामांची पर्वा न करणारा हा योद्धा होता. टिळकांच्या वाणीत व लेखणीतही आग होती. त्या आगीतून क्रांतीच्या ठिणग्या देशभर उडाल्या. ‘केसरी’त आपली मते मांडताना त्यांनी स्वभावास मुरड घातली नाही. टिळकांनी परखडपणे सांगितले आहे (1902), ‘‘आम्ही ‘केसरी’त जे लेख लिहीत असतो ते केवळ राज्यकर्त्यांकरिता नसून आमच्या मनातले विचार, आमच्या मनातील तळमळ किंवा जळफळ सर्व मराठी वाचकांच्या मनात उतरावी एवढ्याकरिता आहे व आमच्या लेखांचा जर असा परिणाम होत नसेल तर आमचे श्रम फुकट गेले असे आम्ही समजू. लेखणीच्या टोकाने व मषीपात्राच्या सहाय्याने पांढऱयावर नुसते काळे करण्याचा आमचा इरादा नाही.’’ टिळकांनी तेव्हा जे सांगितले ते आजच्या काळातही लागू पडते हे महत्त्वाचे. टिळकांनी तोंडपुंजेपणा केला नाही. राज्यकर्त्यांचा तोंडपुंजेपणा हा प्रकार देशाच्या हितास अपायकारक होय असे टिळकांचे मत होते.

1905 च्यास चळवळीत कित्येक लोक तुरुंगात गेले, कित्येक क्रांतिकारक फासावर गेले. लोकमान्यांना शिक्षा झाली. त्यांना सात वर्षे मंडालेत नेऊन टाकले. याच काळात काँग्रेसला तडे गेले, पण काँग्रेस ध्येय, कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर फुटली. आज ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट वगैरे मंडळी फुटतात त्यातली ही फूट नव्हती. ‘स्वराज्य’ हेच ध्येय आहे व हा शब्द वापरायचा की नाही यावर मारामारी झाली. म्हणजे काँग्रेसच्या चळवळीची दिशाहीन वृत्ती पुढे चालवू पाहणार्‍यांचा एक गट आणि देशातील जनतेला चळवळीत ओढून बलदंड आंदोलन ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उभे करणारा जहाल विचारांचा दुसरा गट असे दोन गट निर्माण झाले.

1907 च्या सुरत काँग्रेसमध्ये मवाळ-जहाल असे गट पडले. जनतेच्या चळवळीत फूट पडली. इंग्रजांनी एका गटाला उचलून तुरुंगात टाकून निकालात काढले. जहाल गटावर टिळकांचा प्रभाव होता. त्यांना टिळकांचे धोरण सनदशीर मार्गाने चालवायचे होते. तो गट म्हणायचा, ‘‘उठाव बिठाव काही जमायचा नाही. जनतेला जागृत करून, संघटित करून हळूहळू पुढे नेले तर चळवळ फोफावू शकेल.’’ दुसरा गट क्रांतिवाद्यांचा होता. ‘‘हातात शस्त्र घेऊन इंग्रजांना सरळ मारले पाहिजे, दहशत निर्माण केलीच पाहिजे’’ असे म्हणणार्‍यांचा. टिळकांनीया क्रांतिवाद्यांना अनेकदा मदत केली आहे. रँडचा खून करणारे चापेकर बंधू हे टिळकांचेच अपत्य. स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण ही टिळकांची चतुःसूत्री होती. हाच त्यांचा कार्यक्रम होता, पण स्वराज्याची कल्पना जर कोणी विचारली तर साधारणपणे सांगायचे की, ‘‘सनदशीर मार्गाने चालेल. होम रूल असावे.’’ पण ब्रिटिश साम्राज्य घालविण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला ते तयार होते.

1914 साली टिळकांना तुरुंगातून सोडले. सोडताना इंग्रज सरकारने विचारले, ‘‘काय, बंडबिंड करणार का?’’ टिळक म्हणाले, ‘‘छे, तसे काहीच ठरवलेले नाही.’’ पण टिळक बाहेर आले व त्यांनी चळवळीला सुरुवात केली. सगळ्यांना एकत्र केले. काँग्रेसच्या एकीसाठी प्रयत्न केले. दुरावलेले पुन्हा एकत्र आले. टिळकांनी पुन्हा इंग्रजांना आव्हान दिले, ‘‘होम रूल अधिकार देऊ असे जाहीर करा. आता लगेचच द्या असे नाही. देऊ एवढे नुसते जाहीर करा.’’ इंग्रज म्हणाले, ‘‘ते शक्य नाही.’’ इंग्रजांनी चळवळ मोडून काढण्यासाठी दमनचक्र सुरू केले. तेव्हा राजकीय क्षितिजावर नुकताच गांधींचा उदय झाला होता. ते महात्मा किंवा महापुरुष झाले नव्हते. गांधी म्हणत, ‘‘इंग्रजांना मदत केली पाहिजे. महायुद्धामुळे ते संकटात आहेत. अडचणीत सापडलेल्याला मदत केली पाहिजे.’’ टिळकांना ते मान्य नव्हते.

इंग्रजांच्या मानेवर पाय देण्याची हीच वेळ आहे हे त्यांनी ठरवले. त्याच वेळी रंगरूट भरतीत दंगे सुरू झाले. अनेक प्रांतांतून जबरदस्तीने युद्ध फंडाची वसुली सुरू झाली. गांधींनी टिळकांवर आरोप केला, ‘‘तुम्ही रंगरूट भरतीच्या विरुद्ध आहात.’’ टिळक शांतपणे म्हणाले, ‘‘नाही, विरुद्ध नाही. आमचे म्हणणे इतकेच की, विजयी झाल्यावर त्यांनी आम्हाला स्वराज्य द्यावे.’’

टिळकांचे ध्येय एकच होते ते म्हणजे स्वराज्य. देश स्वतंत्र करण्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारची साधने वापरण्यास ‘जहाल’ टिळकांनी विरोध केला नाही. सशस्त्र उठाव करण्यास चाळीस टक्के लोक जरी तयार असले तरी आपण त्यांचे नेतृत्व करू असे लोकमान्य टिळकांनी सेनापती बापट यांना सांगितले होते. सशस्त्र क्रांतीच्या उलाढाली करणाऱया मंडळींच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहत. त्यामुळे जहाल तरुण वर्गाचा त्यांच्याकडे ओढा असे.

आज अनेक लोक व पंथ छत्रपती शिवाजी महाराजांवर मालकी हक्क सांगत आहेत, पण छत्रपतींची मर्दानगी क्रांतिकारकांत भिनवण्याचे कार्य टिळकांनी केले. त्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला तेव्हा तो शिवाजी उत्सव होता. एका शिवाजी उत्सवाच्या वेळी चापेकर बंधूंपैकी दामोदर चापेकरांची टिळकांनी कानउघाडणी केली होती. त्यावेळी चापेकरांनी ‘शिवाजीचे उद्गार’ नावाची कविता म्हटली होती. कवितेतील छत्रपती शिवाजी म्हणतात, ‘‘आपले मराठी जन परकीय राज्यांत षंढासारखे वागून दुःखे भोगीत आहेत हे पाहून वाईट वाटते.’’ व्याख्यानानंतर चापेकरांना एका बाजूला घेऊन टिळक म्हणाले, ‘‘इतरांना षंढ म्हणतोस असा तू कोण लागून गेलास शूर मर्द! जर तुझ्यासारखे तरुण मर्द असते तर हा रँड जिवंत कसा राहिला असता?’’ सहज उच्चारलेली ही मात्रा प्रेरणादायी ठरली. रँडचा वध करण्याची चापेकरांची इच्छा होती, ती टिळकांच्या पाठिंब्यामुळे पक्की झाली.

22 जून 1897 रोजी रँडचा वध झाला. प्लेगच्या काळात पुण्यातील रँडच्या सोजिरांनी जनतेला छळले होते. टिळक हे मूर्तिमंत धैर्य होते. लाला लजपतराय हे पंजाबातील शेतकर्‍यांचे मोठे नेते. ते महान देशभक्त होते. 9 मे 1907 रोजी इंग्रज सरकारने लजपतराय यांना हद्दपार केले. ही बातमी ऐकताच टिळक खवळले व म्हणाले, ‘‘लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?’’ टिळकांची निर्भयता व बेडरपणा हा असा टोकाचा होता. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक यांनी मर्दानगी व शौर्य आणले. ते शौर्य आजही या ना त्या कारणाने दिसते आहे.

त्या शौर्याचे मूळ टिळकांनी केलेल्या पेरणीत आहे. टिळकांना जाऊन 100 वर्षे झाली, पण शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान, देशभक्ती या चतुःसूत्रीतून टिळक जिवंत आहेत. पुतळे व स्मारकांची गरज मर्दांना लागत नाही. टिळक तसेच होते. टिळक तेल्यातांबोळय़ांचे पुढारी जरूर होते. मर्दांचे लोकमान्य जास्त होते. त्यांनी स्वतः हाती शस्त्र धरले नाही, पण क्रांतिकारकांचे ते ‘केसरी’ होते. टिळकांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER