महापालिकेच्या स्थायी समितीसाठी शिवसेनेने तिस-यांदा केली यशवंत जाधव यांची निवड; निष्ठावान नगरसेवक नाराज

Yashwant Jadhav.jpg

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुन्हा यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावरच पक्षाने विश्वास टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ५ ऑक्टोबर रोजी होत असून यासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज अनुक्रमे यशवंत जाधव व संध्या दोशी यांनी महापालिका चिटणीस संगिता शर्मा यांना सादर केले. यशवंत जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा समिती अध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरत पदाची हॅट्रीक साधणार आहेत.

मुख्य म्हणजे, सर्व विरोधानंतही यशवंत जाधव यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली आहे. दरम्यान, शिक्षण समितीत निष्ठावान शिवसैनिकांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत येत नगरसेवक बनलेल्या कांदिवलीतील संध्या दोशी यांना शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतील निष्ठावान नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

असे असले तरी, स्थायी समितीत भाजप आक्रमक असताना अन्य कुणाला उमेदवारी देण्यापेक्षा शिंगावर घेणाऱ्या जाधव यांच्याशिवाय शिवसेनेकडे पर्याय नव्हता. त्यामुळे यशवंत जाधव यांना हॅट्रीक साधण्याची संधी दिली गेली. असे बोलले जात आहे.

शिक्षण समितीवर मागील वेळेस मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर, अंजली नाईक यांना संधी दिल्यानंतर पक्ष अन्य कुणाला संधी देईल, असे वाटत नव्हते. परंतु पक्षाने कांदिवलीतील नगरसेविका संध्या दोशी यांना उमेदवारी दिली आहे.

संध्या दोषी यांना मागील वर्षी आर-उत्तर व आर- मध्य प्रभाग समिती अध्यक्ष पद देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच वर्षी त्यांना शिक्षण समिती अध्यक्षपद देवून थेट स्थायी समितीत वर्णी लावल्याने एकप्रकारे शिवसेनेतील काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, संध्या दोशी यांनी कोविडच्या काळात आपल्या प्रभागामध्ये युवा सेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना अभिप्रेत असे काम केले होते. त्यामुळेच त्यांना या कामाची बक्षिसी दिल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER