रोजगाराला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेने पदावरून हटवले; पक्षांतर्गत नाराजी तीव्र

रत्नागिरी/प्रतिनिधी :  गावात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रिफायनरी आणि आयलॉग प्रकल्पांना समर्थन देणारे शिवसेनेचे सागवेचे विभागप्रमुख राजा काजवे यांना शिवसेनेने पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी पंचायत समितीचे माजी सभापती आणि रिफायनरीविरोधी शेतकरी व मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काजवे यांनी प्रकल्पाना समर्थन दिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण वाढत चालले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेले काही दिवस आयलॉग व रिफायनरी प्रकल्पावरुन तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या सागवे व देवाचे गोठणे विभागातील पक्ष पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली आहे. रोजगाराची कोणतीच साधने नसल्याने आम्हाला आयलॉग आणि रिफायनरी प्रकल्प हवे आहेत, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे मांडली. त्यामध्ये सागवेचे विभागप्रमुख राजा काजवे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर व अन्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता. काही मंडळींनी तर पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर आम्ही घेतलेल्या भूमिकेपासुन हटणार नाही, असाही पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पांबाबत पूरक भूमिका घ्यावी, अशी मागणी करीत ‘हीच ती वेळ’ अशा आशयाचे फलक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी झळकावले होते. माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी रोजगारासाठी प्रकल्पांची गरज मांडली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेचा विरोध कायम असल्याची भूमिका जाहीर केली. खासदार विनायक राऊत यांनी पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले. त्यानुसार २४ तासातच शिवसेनेने सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांना त्यांच्या पदावरुन तडकाफडकी हटवले आहे. त्या पदावर माजी सभापती कमलाकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली. ही कारवाई शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरुन झाली आहे. त्यामुळे सागवे विभागासह तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये जोरदार नाराजी वाढली आहे. काजवे यांना केवळ विभागप्रमुख पदावरुन हटविण्यात आले असून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. पक्ष विरोधात ज्यांनी भूमिका घेतली आहे, त्यांचा अहवाल तालुकाप्रमुखांकडून आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही चाळके यांनी सांगितले.