मध्यावधीसाठी शिवसेना कधीही तयार – रामदास कदम

नांदेड : शिवसेना हा नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पक्ष असून मध्यावधी निवडणुका झाल्यास त्यासाठी आम्ही कधीही तयारच आहोत आणि याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सुचक वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज केले़

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी मंत्री कदम आले असता दिवसभरात दोन टप्प्यात त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत रामदास कदम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे शेतकऱ्यांसोबत असल्याचे बतावणी करीत आहे तर दुसरीकडे पंतप्रधानांची भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत आहे़. शेतकरी आत्महत्येचे पाप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांनी महाराष्ट्रावर कर्जाचं डोंगर उभं केलं. सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला़, त्यांनी आम्हाला सल्ले देवू नयेत़. असा कडकडीत इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस – राष्ट्रवादीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा कुठलाच अधिकार नाही़. १५ वर्षे सत्तेत राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कुठले विकासाभिमुख कार्य केले? हा महत्वाचा प्रश्न आहे़ सेना मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीकडून हशा पिकवला जात आहे़. कारण सेनेने सत्तेतून बाहेर पडावे आणि राष्ट्रवादीने भाजपला साथ द्यावी अशी त्यांची राजकीय खेळी आहे़. आपल्या कर्माच्या सर्व फायली बंद करण्यासाठीच राष्ट्रवादीला सत्तेत सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे़. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देण्याची आमची तयारी आहे़. जर या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख सत्तेला कधीही लाथ मारतील असेही मंत्री कदम यांनी सांगितले.