शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती

मुंबई : विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पदाच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हे पद काँग्रेसकडेच (Congress) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या पदासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. या पदासाठी नितीन राऊत, के. सी. पाडवी आणि संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत असली तरी शिवसेनेने या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचे समजते. तीन पक्षांचे सरकार चालवायचे असेल तर मुरब्बी राजकारणीच अध्यक्षपदावर हवा, शिवाय राष्ट्रवादीतील काही नेत्यांना चव्हाणच शह देऊ शकतात असा दुहेरी हेतू असल्याने शिवसेनेने त्यांचे नाव अजेंड्यावर आणले आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात घ्यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्राद्वारे सरकारला दिले आहेत. सत्ताविभागणीत अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्यालाच असल्याने नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू होती. राऊत यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे राऊत यांची वर्णी निश्चित मानली जात होती. मात्र सदनाचे कामकाज चालविण्यात अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने तीनही पक्षांच्या सहमतीनंतरच हा निर्णय होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER