
कोल्हापूर : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पुन्हा अंतर्गत बंडाळीला तोंड फुटले आहे. या बंडाळीमुळेच सेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले. जिल्ह्यातील सहा आमदारांच्या जागी सेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. यातून कोणताही बोध न घेता सेनेत एकमेकांवरचे कुरघोडीचे राजकारण अजूनही सुरूच आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद असाच कायम राहणार असेल तर मग यंदातरी महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार होणार का? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकाला पडला आहे.
शिवसेनेत असणारे मतभेद हे नाही नवीन नाहीत. कोल्हापुरातही निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळेच शिवसेना (Shiv Sena) ग्रामीण भागात रुजली आहे. पण शिवसेनेचे विचार पोहचवणाऱ्या त्या कटटर शिवसैनिकाला जेव्हा न्याय मिळाला नाही तेव्हाच बंडाचा झेंडा उगारला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील स्थिती फारशी काही वेगळी नाही. विधानसभा निवडणूकीत नेमके कोणी कोणाला मदत केली. त्याच्या आगोदर झालेल्या महापालिक निवडणूकीत शिवसेना उमेद्वार कस पडले याचे अहवाल मातोश्रीवर पोहचले आहेत. पण त्या अहवालावर धुळ आजपर्यंत झटकली गेली नसावी. संपर्क नेते व संपर्क प्रमुखांना कोल्हापूरात नेमके काय चालले आहे किती गट तट आहेत हे माहीत आहे. पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. जर कारवाईच होणार नसेल तर तक्रार करून करायचे काय? त्यापेक्षा जो गट आपल्या सोयीचा त्याच्या बरोबर राहण्याचे काम शिवसैनिक करत आहे. त्यामुळे ‘शिवसैनिक आहेस ठिक, पण कोणत्या गटाचा’ अशी विचारणा होताना दिसते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सेनेचे केवळ प्रकाश अबिटकर निवडून आले. जिल्ह्यात सेनेचे दोन खासदार निवडून आले. पण आमदार मात्र एकच निवडून येतो. उर्वरीत उमेद्वारांना कोणी पाडले? कसे पाडले याचा अहवाल मातोश्रीवर आहे. किमान महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी सेनेतील या बंडाळीची दखल घेवून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा विधानसभेची पुनरावृत्ती महापालिकेत होण्यास वेळ लागणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला