व्वा रे व्वा ! सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात

Sarpanch in Shiv Sena in the morning, NCP in the afternoon, BJP in the evening

कल्याण : अनेकदा आपण राजकारणात पक्षांतरं पाहिली असतील,जिथे सत्ता तिथे जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. मात्र मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर वेगळंच चित्र पाहायला मिळाले. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीनंतर नवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते प्रमोद हिंदुराव (Pramod Hindurao) यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारत होते.

त्यानंतर हेच पदाधिकारी संध्याकाळी भाजपा (BJP) आमदार किसन कथोरे यांच्याकडे गेल्याचं पाहायला मिळालं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासोबत दिसून आले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा असा दावा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा हे तिन्ही पक्ष करत आहेत. २४ तासांच्या या राजकीय घडामोडींची चर्चा तालुक्यात पसरली, प्रमोद हिंदुराव यांनी निवडून आलेले सरपंच आमचेच असल्याचं सांगितले. तर भाजपा आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) म्हणाले, हे सरपंच आमच्या पक्षाचे आहेत.

मुरबाड तालुक्यात भुवन ग्रामपंचायतीचं सरपंच पद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आरक्षित होते, त्यामुळे याठिकाणी चुरस पाहायला मिळाली, दर्शना बांगर यांची सरपंचपदी तर सुनील बांगर यांची उपसरपंचपदावर निवड झाली.सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी काल दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराव यांनी सरपंचांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पट्टा टाकत त्यांचा सत्कार केला. काही मिनिटात भुवन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.खुद्द हिंदूराव यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याची माहिती दिली.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंचांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुवन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. काही मिनिटातच भुवन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. तर सकाळी हेच सदस्य शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख सुभाष पवार यांच्या भेटीला गेले. तिथे शिवसेनेचा पट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत झाले. २४ तासांत घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER