
अहमदनगर : हे महाविकास आघाडीचं नवीन दशक सुरू झालं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र दिसू शकतात, असे संकेत पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हे दोन्ही नेते बोलत होते.
काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील, आमदार धीरज देशमुख आणि आमदार झिशान सिद्दिकी एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांची मुलाखत घेतली.
कार्यक्रमादरम्यान अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला की, संपूर्ण महाराष्ट्र सध्या पाहातोय की, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार एकत्र काम करत आहेत, हे पाहताना आम्हाला खूप छान वाटतंय. हेच चित्र येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळेल का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक उत्तर दिले.
अकोला जि.प. : भाजपला महाविकास आघाडीची साथ; भारिपची सत्ता जाणार?
या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नक्कीच, गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र मिळून काम करतोय. या काळात एक गोष्ट मला जाणवली की, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षांसोबत काम करणं सोपं आहे. कारण ही आपल्यासारखी लोक आहेत. या दोन्ही पक्षांतील नेते लोकांचा विचार करतात. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्राचा विचार करतात. आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे, तीन वेगळ्या टोकांचे पक्ष आहेत. पण तरीदेखील महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सर्व एकत्र आलेत. राज्यासाठी एकत्र काम करत आहेत. हीच आपल्या देशाची लोकशाही आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, आमच्या तिन्ही पक्षांमधील नेत्यांचे चांगले ऋणानुबंध होते आणि आजही कायम आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षात होतो; परंतु आमचे जवळचे लोक एकमेकांच्या पक्षात आहेत. पवार कुटुंबासोबतचे आमचे संबंध तर अधिकच मजबूत आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबतही आमचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्यासोबत काम करणं सोपं होतं. ते मुख्यमंत्री असताना आमचा पक्ष विरोधी बाकावर होता, परंतु कोणतीही कटुता आमच्या मनात नव्हती. माझी आणि धीरजची मैत्री आहे, माझी आणि रोहितची मैत्री आहे. माझ्या आजोबांची (बाळासाहेब ठाकरे) शरद पवारांसोबत खूप घट्ट मैत्री होती. ही सगळी नाती आता जवळ आली आहेत. कौटुंबिक नाती, मैत्रीची नाती एकत्र आली आहेत. विशेष म्हणजे आम्ही अशा वेळी एकत्र आलो आहोत जेव्हा या राज्याला त्याची गरज होती.
अवधूत गुप्ते यांनी हाच प्रश्न आमदार रोहित पवार यांना विचारला. त्यावर रोहित म्हणाले की, महाविकास आघाडीचं जे समीकरण जुळलं ते एका विचाराचं आहे. हा एकत्र येण्याचा विचार पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंच्या, शरद पवारांच्या, विलासराव देशमुखांच्या मनात यापूर्वी आला असेलही. परंतु त्यांनी ते कधीही उघड केले नाही. ते शक्य झालं नसेल. परंतु चार महिन्यांपूर्वी हा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आला. त्यांनी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं. त्यामुळे सर्वांची मनं एकत्र आली. वेगळं समीकरण बनलं आणि लोकांची सत्ता स्थापन झाली. पुढील काळात निवडणुका होणार आहेत. तेव्हा सर्वसामान्यांसाठी योग्य ते राजकीय समीकरण पाहायला मिळेल. नगर जिल्ह्यातसुद्धा महाविकास आघाडी आहे. हे समीकरण बऱ्याच टिकाणी पाहायला मिळेल. असे संकेत रोहित पवार यांनीसुद्धा दिले.