पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र; पटोले म्हणतात, ‘पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही’

Nana Patole - Sanjay Raut

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी (Shiv Sena-NCP) एकत्रित निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. सोबतच काँग्रेसलाही सोबत घेण्याचा विचार करु, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊतांच्या या घोषणेनंतर काँग्रेसचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला असता, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सडेतोड उत्तर दिले. स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेत पुण्यात महाविकास आघाडी करण्याबाबत निर्णय घेऊ, मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊनच योग्य निर्णय घेण्यात येईल. आमच्यात मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मिळून निर्णय घेऊ. संजय राऊत यांनी जे सांगितलं ते स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यात जी महाविकास आघाडी आहे, ती भाजपला थांबवण्यासाठी आहे. भाजप देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवत आहे. भाजप देशाला तोडण्याचं काम करत आहे, आम्ही आघाडीसोबत आहोत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती.

मी परवा भंडाऱ्यात होतो, सध्या कोव्हिड सुरु असल्याने माझी जबाबदारी आहे, की मी स्वतःला तपासून घ्यावं. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आयसोलेशनमध्ये राहिलो. तीन तासात माझा रिपोर्ट आला. मला काही त्रास नाही, म्हणून मी पुन्हा लोकांमध्ये आलो. असं नाना पटोलेंनी सांगितलं.

देशामध्ये सगळे अधिकार फक्त नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच आहेत, अशाप्रकारे ते वागत आहेत. भाजपचा (BJP) स्थानिक अध्यक्ष रुबल शेख यांच्यावर पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घराची झडती झाली तेव्हा कळलं की तो बांगलादेशी आहे. सीएए इतरांसाठी आणि भाजपचे कार्यकर्ते आता सीएए कायदा मोडतात, तर अमित शाहांना देशाच्या गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे की या पद्धतीने बांगलादेशींना भाजपचा उत्तर मुंबई अध्यक्ष केल्यानंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला का? असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER