
सिंधुदुर्ग : २०२२ मध्ये गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) लक्षात घेता महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजपाविरोधात आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गोव्यात महाविकास आघाडी (MVA) स्थापण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी शरद पवार यांना मध्यस्थीसाठी विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.
केसरकर म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणे गोव्यात भाजपाविरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल. भाजपाने गोव्यातून प्रादेशिक पक्षांना संपवलं आहे. भाजपाच्या या भीषण वृत्तीला थांबवण्यासाठी भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. याद्वारे गोव्याला विभाजित करणारी धर्मनिरपेक्ष मतं वाचवली पाहिजेत. उत्तर गोवा जो महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या जवळचा भाग आहे. या भागात शिवसेनेचं चांगलं स्थान आहे. याठिकाणी आगामी २०२२ मध्ये गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दोन ते तीन जागा जिंकू शकते, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला