शिवसेनेच्या राष्ट्रीय विस्तारासाठी पश्चिम बंगालमध्ये ‘हीच ती वेळ’ – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे. ट्विटरवरुन राऊत म्हणाले की, पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेण्यात आला. यावर आज प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून समोर करण्यासाठी पश्चिम बंगालमधील निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी ‘हीच ती वेळ’ आहे.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की, शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर विस्तार करायचा आहे. यासाठी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात येईल. शिवसेना कोणत्या पक्षाला पराभूत करण्यासाठी ही निवडणूक लढवणार नसून, विस्तारासाठी हे प्रयत्न आहेत. जाणीव यासाठी हीच ती वेळ आहे.

आम्ही कुणाला हरवण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी पश्चिम बंगालच्या निवडणुका लढवत नाही. पश्चिम बंगालमध्ये आम्ही बऱ्याच वर्षांपासून काम करत आहोत. सध्या तिथे हिंदूत्व आणि राष्ट्रभक्तीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे ज्यांना भाजप आणि तृणमूल नकोय, त्यांच्यासाठी शिवसेना हा पर्याय होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही पश्चिम बंगालमध्ये लढण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. मतांची विभागणी करण्यासाठी आम्ही पश्चिम बंगालमध्ये जात नाही. काही लोकांनी मतांची विभागणी करण्यासाठी तिथे एमआयएमची व्यवस्था केली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. लवकरच पश्चिम बंगालमध्ये जाऊन किती जागा लढवायचा याचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी प्रकरणावर भाजपलालक्ष्य केले. गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आता याप्रकरणावर बोललं पाहिजे. याबाबत त्यांची मते काय आहेत, याविषयी आमच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर भाष्य केलं. ही तर विजयाची सुरुवात आहे, असं ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे. तसेच यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार असल्याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. या विषयावर बोलणार नसल्याचं ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. पवार हे शेतकरी नेते आहेत. हा प्रश्न पवारांकडून समजून घेतला असता तर प्रश्न चिघळला नसता असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेनेची विजयी घोडदौड म्हणजे जनतेकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER