लोकसभेत शिवसेना खासदाराची नवनीत राणांना जेलमध्ये टाकण्याची धमकी, तक्रार दाखल

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद आज लोकसभेतही उमटल्याचे दिसून आले. भाजपचे खासदार गिरीश बाटप आणि खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलतांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे प्रकरण, तसंच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते, असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER