मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीचे राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काही दिवसांपूर्वीच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात बिहारमधील जनतेला कोरोनाची लस फुकट देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. त्यावर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

प्रत्येकाला लस मोफत मिळावी ही आमचीही इच्छा आहे.मात्र आमचे मुख्यमंत्री कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत, असा चिमटा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काढला आहे . राज्यात कोरोनाचं संकट असताना शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्यानं भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली. त्या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.

‘जनाची आणि मनाची कोणी कोणाची काढायची? विरोधकांची ही टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनाही लागू पडते का? कारण सरसंघचालकांनीदेखील आज मेळावा घेतला. आम्ही त्यांचा आदर करतो.’ असे राऊत म्हणाले. आम्हाला जनाची, मनाची आहे म्हणूनच शिवतीर्थावर होणारा भव्य मेळावा सावरकर सभागृहात घेत आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी हजारोंची गर्दी असलेल्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये घेत आहेत. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर टीका करत असाल तर मोदींच्या सभांचं काय? तिथे जनाची, मनाची, तनाची, धनाची बाळगली जात नाही, अशा तिखट शब्दांत राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांकडून आज सीमोल्लंघन तर दिवाळीत राजकीय भूकंपाची तयारी पूर्ण – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER