शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप

Sanjay jadhav

परभणी : परभणीचे शिवसेना (Shivsena) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) आमची जमीन बळकावली असा आरोप मृत शिवसैनिक स्वप्नीलची पत्नी, आई व दोन बहिणींनी पत्रकार परिषद घेऊन केला.

स्वप्नीलचे वडील रामप्रसाद काळे हे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत. स्वप्नील हा शिवसैनिक होता व संजय जाधव यांचा जवळचा कार्यकर्ता होता. स्वप्नीलचा लिव्हर सोयरासिस ने १८ एप्रिल २०१९ रोजी मृत्यू झाला. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर रामप्रसाद काळे यांनी त्यांच्या १८ एकर शेतीनीपैकी ३ एकर ३५ गुंठे शेती २७ ऑक्टोबर २०२० रोजी परभणीचे खासदार संजय जाधव यांना ४४ लाख ५३ हजार रुपयांना विकली. ती जमीन खासदारांनी त्यांच्या पत्नी क्रांती संजय जाधव यांच्या नावाने खरेदी केली.

स्वप्नीलची आई प्रेमा काळे, पत्नी वर्षा आणि बहिणी सारिका व शीतल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, ही जमीन वडिलोपार्जित होती. रामप्रसाद (स्वप्नीलचे वडील) यांच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन, आम्हाला विश्वासात व आमची संमती न घेता संजय जाधव यांनी जमीन परस्पर विकत घेऊन बळकावली. याबाबत काळे कुटुंबीयांनी खासदार संजय जाधव, त्यांची पत्नी क्रांती यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

जाधव यांनी आरोप फेटाळले

खासदार संजय जाधव यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. हा व्यवहार चेकने झाला, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी माझ्याविरोधात हे षडयंत्र रचले असा आरोप संजय जाधव यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER