
पालघर : पालघरचे (Palghar) खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्यावर नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिला खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. राजेंद्र गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
तक्रारदार महिला गेल्या १५ वर्षांपासून खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये कामाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा लैंगिक छळ, अत्याचार, शोषण केले जात आहे. सन २००५ मध्ये गावित अचानक घरी आले आणि भेटवस्तू म्हणून मोबाईल आणला आहे, असे सांगितले. त्यावेळी मी तो घेण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याशी मैत्री कर, तुला घर, पैसा सर्व देतो, मला शारीरिक सुख दे, असे म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय अनेकदा आपला विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या अगोदर मी कोकण भवन पोलीस महानिरीक्षकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, राजकीय दबाव असल्याने माझी तक्रार नोंदवली गेली नाही. आज माझी तक्रार दाखल केली. गावित मोठे नेते आहेत, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.
या संदर्भात सहायक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्याशी संपर्क साधला असता कॅमेरा समोर बोलू शकत नाही, असे म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क केला असता, त्या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही, माझ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी फक्त लेखी पत्र दिले आहे. माझ्या गॅस एजन्सी मध्ये ही महिला गॅसचा काळाबाजार करायची. माझ्या कंपनीत १ कोटी पेक्षा अधिक पैशांची त्यांनी अफरातफर केली आहे. याबाबत मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सहा दिवस त्यांनी तरुंगवासही भोगला आहे. सदरचा आरोप खोटा आहे अशी माहिती खासदार गावित यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला